दिंडोशी विधानसभा क्षेत्रातील मतदार, महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आणि नेते, हेच ‘स्टार प्रचारक’
विकासकामांमुळे दिंडोशीत सुनील प्रभूंची हॅट्ट्रीक निश्चित!

मुंबई : सुसज्ज रस्ते, मुबलक पाणी, पुनर्विकासाच्या प्रश्नांसह नागरिकांना दर्जेदार नागरी सुविधा मिळाल्यामुळे दिंडोशी विधानसभा शिवसेनेचा बालेकिल्ला बनला आहे. त्यामुळेच मतदारांनी शिवसेना आमदार सुनील प्रभू यांना दिंडोशीतून सलग दोन वेळा भरघोस मतांनी निवडून दिले आहे. याच पार्श्वभूमीवर आज दिंडोशीत झालेल्या प्रचारसभेला तुडुंब गर्दी करीत मतदारांनी प्रतिसाद दिला. यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत आमदार सुनील प्रभू हॅट्ट्रीक करणार असल्याचे स्पष्ट चित्र सध्या मतदारसंघात दिसत आहे. दिंडोशी विधानसभा क्षेत्रातील मतदार, महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आणि नेते, हेच माझे ‘स्टार प्रचारक’ असून विकासाच्या मुद्द्यावरच निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचे यावेळी सुनील प्रभू म्हणाले. तसेच अपक्षांना मत म्हणजे संजय निरुपमला मत, हे सर्व अपक्ष संजय निरुपमची बी टीम आहेत असे देखील सुनील प्रभू म्हणाले
दिंडोशी मतदार संघात आयोजित सभेत महाविकास आघाडीचे उमेदवार शिवसेनेचे सुनील प्रभू यांनी यावेळी मार्गदर्शन केले. विरोधकांचे उमेदवार संजय निरुपम मतदारांना भुलथापा देत असून निवडणुका आल्या की त्यांना मतदार आठवतात असा टोलाही प्रभू यांनी यावेळी लगावला. मी स्थानिक उमेदवार असून आपल्या सोबत २४ तास उपलब्ध आहे. आपल्या कार्यकाळात दिंडोशीत रस्ते रुंदीकरण, पाण्याचा प्रश्न सोडवला, डायलिसिस सेंटर, वाचनालय, फ्री यू, विकसित होत असलेला गोरेगाव मुलुंड लिंक रोड, रत्नागिरी ते लोखंडवाला डीपी रोड, कुरार भुयारी मार्ग, अप्पा पाडा अर्बन पब्लिक हेल्थ सेंटर, नागरी निवारातील असेसमेंटचा प्रश्न डीम्ड कन्व्हेंटचा प्रश्न, देशातील स्त्रीशक्ती मृणाल ताई गोरे उद्यान अशी कामे केल्याचे ते म्हणाले. मालाड जलाशय टेकडीतील पाण्याची पातळी वाढवून नागरी निवारा परिषद परिसरात पुरेसा पाणीपुरवठा उपलब्ध होईल, असे प्रभू म्हणाले. यावेळी उपस्थित शिवसेना उपनेते संजय घाडी शिवसेना उपनेते अमोल कीर्तिकर, युवा सेनेचे अंकित प्रभू, शिवसेना उत्तर प्रदेश प्रमुख अनिल सिंग, राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित रावराणे, ‘आप’च्या रूबेन, अॅड. सुरेंद्र यादव, उत्तर भारतीय राष्ट्रवादी काँग्रेसचे श्रीकांत मिश्रा, मुंबई उपाध्यक्ष, संतोष सिंग, काँग्रेसचे दुर्गेश यादव, शिवसेना संघटक, गौरीशंकर चौबे आदी मान्यवर उपस्थित होते.
निष्ठावंत नेता, आदर्श लोकप्रतिनिधी
– सुनील प्रभू अभ्यासू प्रामाणिक निष्ठावंत, आदर्श लोकप्रतिनिधी, उत्कृष्ट वक्ता असल्याचे गौरवोद्गार यावेळी मान्यवरांनी बोलताना काढले. त्यांना सर्वसामान्यांचे प्रश्न जवळून माहिती असल्यामुळे ते विधानसभेत यासाठी आवाज उठवतात. ही लढाई आता महाराष्ट्रद्रोही गद्दार विरुद्ध निष्ठावंत अशी असून यामध्ये निष्ठावंतच बाजी मारतील असा विश्वासही मान्यवरांनी व्यक्त केला.