मुंबई,दि.१३: जलसंपदा विभागाचे वादग्रस्त अप्पर मुख्य सचिव विजय गौतम यांची सेवानिवृत्ती नंतर देखील पुन्हा जलसंपदा विभागात वर्णी लावण्यावरून निर्माण झालेला वाद ताजा असतानाच, विभागाच्या विविध कामांच्या मंजूर फाईल्स पुन्हा वित्त विभागाकडे पाठविण्यावरून जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी काल पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत थयथयाट केल्याचे वृत्त समोर आले आहे.
मंजूर झालेल्या कामाच्या फाईल्स वित्त विभागाकडे पुनर्विचारार्थ पाठवल्याने जलसंपदा मंत्री राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्यावर प्रचंड नाराज झाले व असे असेल तर जलसंपदा विभाग कायमस्वरूपी बंद करून टाका अशा शब्दांत त्यांनी मुख्य सचिवांना मुख्यमंत्र्यांसमोरच धारेवर धरले.
काही दिवसांपूर्वी मंत्रिमंडळ बैठकीतही जयंत पाटील यांनी अशाचप्रकारे मुख्य सचिवांना लक्ष्य केले होते. काल पुन्हा एकदा जयंत पाटील यांनी मुख्य सचिवांवर हल्लाबोल केल्याने बैठकीत उपस्थित मंत्री चकित झाले.
काही वर्षांपूर्वी देशात गाजलेल्या राष्ट्रकुल घोटाळ्यात सदर विजयकुमार गौतम यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते. इतकेच काय त्यांचे निवृत्तीवेतन थांबवण्याबाबत केंद्रीय कार्मिक विभागाने सूचित केले होते.अशा डागी सचिवांना पुन्हा जलसंपदा विभागात सेवानिवृत्तीनंतर एक वर्षासाठी नियुक्त करण्यामागे मंत्री महोदयांना काय इंटरेस्ट आहे याची खमंग चर्चा मंत्रालयातील अधिकारी वर्गात सुरु आहे. यातच काल मंत्रिमंडळ बैठकीत घडलेल्या या प्रकारामुळे जलसंपदा खाते व मंत्री जयंत पाटील चर्चेत येऊ लागले आहेत.