..तर मुंबईत लॉकडाउनचा विचार करावा लागेल, महापौर किशोरी पेडणेकर यांचा गंभीर इशारा

मुंबई – राज्यात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. रोज कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. याशिवाय ओमायक्रॉन बाधितांच्या संख्येतही भर पडत आहे. राज्य सरकारकडून निर्बंध अधिक कडक केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबई, ठाणे या ठिकाणी ऑफलाईन शाळा, महाविद्यालये ३१ जानेवारीपर्यंत बंद करण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनाने घेतला आहे. अश्यात आज महापौर किशोरी पेडणेकर यांनी पत्रकार परिषदेत नागरिकांना कोरोना नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना केल्या आहेत.
‘मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल चहल सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. आज कुणालाही लॉकडाउन नको आहे. मात्र, लॉकडाउनचे सावट निर्माण झाले तर सगळ्यांचे कंबरडे मोडेल. त्यामुळे सर्वांनी नियमांचे पालन करून योग्य ती काळजी घेतली आणि सर्वजण जबाबदारीने वागले तर लॉकडाउनचा पर्याय आपल्या समोर नसेल.अन्यथा लॉकडाउन शिवाय पर्याय नाही. परंतु रोजच्या रूग्णसंख्येने २० हजारांचा आकडा ओलांडला तर केंद्राच्या नियमानुसार राज्य सरकार आणि महापालिका या नियमांची पूर्तता करेल’, असे किशोरी पेडणेकर म्हणाल्या.
वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.याच सोबत राज्यात निर्बंध देखील लावण्यात आले आहेत.याच भान ठेवून येत्या काळात सर्वांनी सार्वजनिक ठिकाणी नियमांचे काटेकोर पालन करण्याची विनंती महापौर किशोरी पेडणेकर यांनी केली आहे.