जनतेकडून पक्षाच्या तिजोरीत पैसे गोळा करून देश बलाढ्य करण्याचे हे कोणते सूत्र,संजय राऊतांची भाजपवर टिका

मुंबई- भारतीय जनता पार्टीने आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निधी उभा करण्यासाठी ‘माइक्रो डोनेशन अभियान’सुरु केले आहे. सदर अभियान ११ फेब्रुवारी २०२२ पर्यंत राबवले जाणार आहे. याच मुद्दयावरून आता शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी आजच्या सामना अग्रलेखाच्या माध्यमातून भाजपवर जोरदार प्रहार केला आहे. तसेच जनतेकडून पक्षाच्या तिजोरीत पैसे गोळा करून देश बलाढ्य करण्याचे हे कोणते सूत्र? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
अग्रलेखात राऊत म्हणाले आहेत की,’देश बलाढ्य करण्याची युक्ती भाजपच्या तिजोरीत अडकून पडली आहे हे नव्यानेच समजले. कालपर्यंत वाटत होते असंख्य हुतात्मे, स्वातंत्र्यवीर, महात्मा गांधी, पंडित नेहरू, सरदार पटेल, इंदिरा गांधी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह मेहनत करून घामाचे शिंपण करणारे लोक, शास्त्रज्ञ, सैन्य यांच्यामुळे आपला देश बलाढ्य होत जाईल, पण हे सर्व कुचकामी असून भाजपच्या देणगीच्या पावत्या फाडल्याने देश मजबूत होईल. यामुळे देश आणखी बलाढय खरंच होईल? लडाखमध्ये घुसलेल्या चिन्यांना मारून बाहेर काढण्याचे बळ या देणग्यांतून देशाला मिळणार असेल तर देणगी मोहिमेचे स्वागत करायला हरकत नाही’, असेही ते म्हणाले आहेत.
पुढे ते म्हणतायत की,’आजही उत्तर प्रदेशात जसजशा निवडणुका जवळ येऊ लागल्या तसतशा आयकर विभागाच्या धाडींचा जोर वाढू लागला. या धाडींमागे एक राजकीय सुसूत्रता आहे. उत्तर प्रदेशात निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना मैदानातील एक प्रमुख खेळाडू बहनजी मायावती या स्वतःच तंबूत परतल्या आहेत. याचे रहस्यही सगळे जण जाणून आहेत. यामागे कोण व का? हे उघड आहे. अयोध्येत राममंदिर उभारणीसाठी हजारो कोटी रुपये आधीच जमा झाले असतानाही रामाच्या नावावर जनतेकडून पावत्या फाडण्याच्या प्रकारांवरही टीकेची झोड उठली.
भाजपच्या श्रीमंतीचे टोक किती उंचावर गेले आहे. ते अयोध्येत भाजप परिवारांतील प्रमुख लोकांनी केलेल्या जमीन खरेदीवरून काल दिसले. ही अशी श्रीमंती ओसंडून वाहत असताना विशेष देणगी मोहीम राबविण्याचे प्रयोजन का? याचेही उत्तर मोदी यांनी देऊन टाकले आहे. ‘देशास सर्वोच्च प्राधान्य देणाऱ्या व आजन्म देशसेवा करणाऱ्या आमच्या पक्ष कार्यकर्त्यांच्या संस्कृतीला या मोहिमेमुळे अधिक बळ मिळेल. तुमच्या मदतीमुळे भाजप व आपला देश आणखी बलाढय़ होईल’, अशी चिंता पंतप्रधान मोदींनी करावी हे आश्चर्यच आहे असे सुद्धा अग्रलेखात म्हटले आहे.






