कोंकण

सर्व शंका दूर करूनच रिफायनरी उभारणार – उदय सामंत

नव्याने जाहीर झालेली एमआयडीसी आणि रिफायनरी याचा काही संबंध नाही

रत्नागिरी – राजापूरमध्ये नव्याने जाहीर झालेली एमआयडीसी आणि रिफायनरी याचा काही संबंध नाही. ही एमआयडीसी फक्त राजापूरसाठी असून त्याठिकाणी पर्यावरणपूरकच उद्योग आणले जातील. अशी ग्वाही देतानाच रिफायनरीसारखे प्रकल्प आणताना शेतकऱ्यांच्या शंका दूर करुनच रिफायनरीची उभारणी केली जाईल. बळाचा वापर करुन प्रकल्प लादले जाणार नाहीत, अशी ग्वाही रत्नागिरीटे पालकमंत्री उदय सामंत यांनी आज येथील जनता दरबारात दिली.

राजापूर पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात राजापूर तालुक्याचा जनता दरबार आयोजित करण्यात आला होता. राजापूर तालुक्यातील जनतेच्या समस्या व प्रलंबित प्रश्न ऐकून घेतल्यानंतर पालकमंत्री बोलत होते.

रस्ते, बांधकाम, पाणी, वीज अशा विविध विभागातील समस्या यावेळी तालुक्यातील जनतेने पालकमंत्र्यांसमोर मांडल्या. प्रत्येक समस्या व प्रश्न ऐकून घेतल्यावर पालकमंत्र्यांनी त्या त्या समस्यांचा जलद गतीने निपटारा होण्यासाठी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या, तर काही प्रश्नांना प्रस्ताव दिल्यास निधीची तरतूद लगेच केली जाईल, असे आश्वासन दिले.

राजापूर तालुक्यात सध्या महावितरण कंपनीच्या सुरू असलेल्या भोंगळ कारभाराचा पाढा जनतेने वाचताच श्री. सामंत यांनी महावितरणच्या अधिकाऱ्याना चांगलेच धारेवर धरले. किमान गणपती सणांबरोबरच येणाऱ्या सर्वधर्मीयांच्या सणांमध्ये तरी लाइट घालवू नका, अशा सूचना दिल्या. राजापूर शहरालगतच्या धोपेश्वर इनाम जमिनींचा प्रश्न लागलीच सोडवून देवस्थान इनाम नसलेल्या जमिनीच्या व्यवहारांना आडकाठी करू नका, अशा सूचनाही यावेळी पालकमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्याना दिल्या.

या जनता दरबारात तालुक्यातील पाणी योजनांचा प्रश्न चांगलाच गाजला. एखादा अधिकारी किंवा सरपंच कुणाला पाण्यापासून वंचित ठेवत असेल, तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करा, पण कोणीही कुठल्याही राजकीय पक्षाचा असला तरी त्याला पाणी मिळालेच पाहिजे, अशा सूचनाही श्री. सामंत यांनी केल्या.

जनता दरबारात विविध विभागांचे जिल्हास्तरीय अधिकारी, राजापूरच्या प्रांताधिकारी वैशाली माने, तहसीलदार शीतल जाधव, पोलीस निरीक्षक राजाराम चव्हाण, गटविकास अधिकारी राजाराम जाधव व इतर अधिकारी, कर्मचारी तसेच तालुक्यातील जनता मोठ्या संख्येने हजर होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!