स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीदिवशीचं का साजरा केला जातो राष्ट्रीय युवा दिन?

स्वामी विवेकानंद यांची दरवर्षी १२ जानेवारी रोजी जयंती साजरी केली जाते. हा दिवस देशातील तरुणांना समर्पित केला गेला असून तरूणांकडे भारतासाठी निरोगी आणि चांगले भविष्य घडवण्याची क्षमता आहे. स्वामी विवेकानंदांचे तरुणांशी घट्ट नाते होते, त्यामुळे त्यांची जयंती तरुणांना समर्पित करण्यात आली आहे. म्हणूनच त्यांच्या जयंतीदिवशी राष्ट्रीय युवा दिनही साजरा केला जातो.
स्वामी विवेकानंद यांचा जन्म १२ जानेवारी १८६३ रोजी कोलकत्ता येथे झाला. त्यांचे खरे नाव नरेंद्रनाथ दत्त होते. ते वेदांताचे प्रसिद्ध आणि प्रभावशाली आध्यात्मिक गुरु होते. वयाच्या २५ व्या वर्षी विवेकानंदांनी सांसारिक आसक्तीचा त्याग केला आणि ते संन्यासी झाले. १८८१ मध्ये विवेकानंदांनी रामकृष्ण परमहंस यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी जगभरातील लोकांना तत्त्वज्ञानी आणि विचारवंत म्हणून प्रेरणा देण्यास सुरुवात केली.
विवेकानंदांना धर्म, तत्वज्ञान, इतिहास, कला, सामाजिक शास्त्र, साहित्य यांचे ज्ञान होते. शिक्षणात पारंगत असण्यासोबतच त्यांना भारतीय शास्त्रीय संगीताचेही ज्ञान होते. त्यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय युवा दिन साजरा करण्यामागचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे स्वामी विवेकानंदांच्या आदर्शांचे आणि विचारांचे महत्त्व भारतातील तरुणांमध्ये रुजवणे तसेच त्यांचे शिक्षण आणि आदर्श भारतीय तरुणांसाठी एक प्रेरणा म्हणून प्रक्षेपित केले जावे.याच उद्देशातून स्वामी विवेकानंद यांची जयंती राष्ट्रीय युवा दिन साजरा केला जातो.