मुंबई

आयएएस – आयआरएसांना वेगळा न्याय का? विधानसभेत सुनील प्रभू आक्रमक

मुंबई – पावसाळी अधिवेशनाच्या आठव्या दिवशी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रतोद सुनील प्रभू यांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले. राज्यातील 12 सनदी (आयएएस) अधिकारी प्रतिक्षेत असताना केंद्रातील महसूल अधिकारी (आयआरएस) सुधाकर शिंदे गेले 9 वर्षे प्रतिनियुक्तीवर राज्यात कसे काय राहिले, असा सवाल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आणि प्रतोद सुनील प्रभू यांनी विधानसभेत राज्य सरकारला विचारला.

केंद्रीय सेवेतील आयआरएस अधिकारी असलेले सुधाकर शिंदे 24 नोव्हेंबर 2015 पासून राज्य सरकारमध्ये प्रतिनियुक्तीवर कार्यरत आहेत. त्यांना सुरुवातीला 3 वर्षांसाठी राज्यात प्रतिनियुक्ती दिली होती. त्यानंतर शासनाच्या विनंतीनुसार त्यांचा कार्यकाळ 23 नोव्हेंबर 2022 पर्यंत म्हणजेच 4 वर्षांसाठी वाढवला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विनंतीनुसार त्यानंतरही 1 वर्षाची मुदतवाढ देऊन हा कार्यकाळ 2023 पर्यंत करण्यात आला. आता परत एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्राला 22 नोव्हेंबर 2027 पर्यंत सुधाकर शिंदे यांची प्रतिनियुक्ती वाढवण्याबाबत प्रस्ताव पाठविला आहे. वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी त्यांना 31 मे 2024 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. मात्र 31 मे नंतर केंद्र सरकारकडून कोणताही मुदतवाढीचा प्रस्ताव संमत झालेला नसतानाही सुधाकर शिंदे बेकायेशीरपणे मुंबई महापालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून कसे काम करू शकतात. पुढील काळासाठी केंद्राच्या मंत्रिमंडळ नियुक्ती समितीकडे प्रस्ताव पाठविला असल्याने त्यांच्यावर एव्हढी मेहेरनजर का, असा सवालही आमदार सुनील प्रभू यांनी केला. सत्ताधारी पक्षाच्याच एका सदस्याने सुधाकर शिंदे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केल्यावर ही माहिती समोर आली.

ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांनी IRS अधिकाऱ्यांना मिळत असलेल्या वेगवेगळ्या न्यायाविरोधात विधानसभेत भाष्य केलं. यावेळी त्यांनी अनेक IRS अधिकाऱ्यांची नावंही वाचून दाखवली आणि सरकारला एका अधिकाऱ्याला 9 वर्षे कार्यरत ठेवण्याचं कारणही विचारलं. मला सुधाकर शिंदे यांच्याबद्दल राग नाही, पण ते एवढे चांगले अधिकारी असतील तर त्यांचा जीवनगौरव देऊन सत्कार करा, पण त्यांची प्रतिनियुक्ती संपल्यावर त्यांना पुन्हा केंद्रात पाठवा, अशी मागणी देखील त्यांनी केली. एका अधिकाऱ्याला एक न्याय आणि दुसऱ्याला दुसरा, असं करणं योग्य नसल्याचं देखील ते यावेळी म्हणाले. वानगी दाखल त्यांनी आयआरएस अधिकारी पल्लवी दराडे यांचे उदाहरण दिले. दराडे पालिकेत असताना त्यांचा तीन वर्षांचा कालावधीही पूर्ण करू न देता त्यांची बदली करण्यात आल्याचे प्रभू सभागृहात म्हणाले.

मुंबई महापालिकेचे 100 सहाय्यक अभियंते हे प्रतीक्षेत असून पदोन्नतीपासून वंचित आहेत. तर राज्यातील 12 सनदी अधिकारी प्रतिक्षेत असताना या महसूल खात्यातील अधिकाऱ्याला आपल्याकडे प्रतिनियुक्तीवर इतके दीर्घकाळ का ठेवण्यात आले? एकाला एक न्याय व दुसऱ्याला दुसरा न्याय का दिला जातोय असा सवाल करत याबाबत चौकशी तसेच खुलासा करण्याची मागणी आमदार सुनील प्रभू यांनी सरकारकडे केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!