पुणे महापालिकेसाठी भाजप-मनसे युतीबाबत राज ठाकरेंनी स्पष्ट केली भूमिका,म्हणाले.

पुणे- भाजप-शिवसेना युती तुटल्यानंतर भाजपसोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेने सोबत युती करणार असल्याच्या चर्चांना मध्यंतरी उधाण आले होते. आगामी महापालिका निवडणुकीत भाजप-मनसे युती होणार अशी चर्चा रंगली होती. मात्र, आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
आगामी महापालिका निवडणुकीत भाजपसोबत युती होणार नाही. करायची असल्यास, त्याच निर्णय मी घेईन असे सांगत राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांसमोर आपली भूमिका स्पष्ट केली. तसेच पक्षसंघटना बळकट करा, त्या जिवावर तुम्ही निवडून येणार आहात. भाजपच्या जिवावर तुम्ही मोठे होणार नाहीत, असा सल्लाही त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.
पुण्यातील विधानसभानिहाय कार्यकर्त्यांच्या बैठका राज ठाकरे यांनी बुधवारी घेतल्या. त्यावेळी त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. या बैठकीला शाखाप्रमुख, विभाग उपाध्यक्ष, शाखा उपप्रमुख यांनाच प्रवेश देण्यात आला होता. शहरातील पक्षाचे पदाधिकारी, आजी-माजी नगरसेवक यांची बैठक शुक्रवारी होणार आहे. राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेतानाच त्यांना पक्षसंघटना वाढवण्यासाठी कोणत्या गोष्टी कराव्यात, याच्या सूचना दिल्या.