बाळासाहेबांच्या स्वप्नातील कृष्णाखोरे प्रकल्प पुरंदर तालुक्यात प्रत्यक्षात आणण्यासाठी विजय शिवतारे यांना विजयी करा – डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या स्वप्नातील कृष्णाखोरे प्रकल्प पुरंदर तालुक्यात प्रत्यक्षात आणण्यासाठी विजय शिवतारे यांना विजयी करावे असे प्रतिपादन शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले. त्या आज पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघाच्या शिवसेना महायुतीचे उमेदवार श्री विजय शिवतारे यांच्या प्रचारार्थ पुरंदर तालुक्यातील वाघमारेवाडी, कोळविहिरे, भोरवाडी, सुकलवाडीसह इतर गावांच्या दौऱ्यावर आल्या होत्या. तसेच यादौऱ्यात शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी विजय शिवतारे यांच्या सासवड येथील निवासस्थानी भेट दिली व विधानसभा निवडणुकीबाबत राजकिय संवादही साधला
यावेळी शिवसेना नेत्या डॉ नीलम गोऱ्हे म्हणाल्या, गेली पंचवीस वर्ष सत्तेमध्ये असणाऱ्या पक्षांना राज्यातील जनतेचा विकास करता आला नाही तो विकास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने गेल्या अडीच वर्षात केलेला आहे. तसेच गोरगरीब जनतेचे, शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी महायुतीचे सरकार कटिबद्ध आहे. त्याकरिता पुरंदर हवेलीतून शिवसेना महायुतीचे उमेदवार विजय शिवतारे यांना भरघोस मतांनी निवडून दिले पाहिजे. पुरंदर तालुक्याचा गोरगरीब जनतेसाठी शेतकऱ्यांसाठी कष्टकऱ्यांसाठी विजय शिवतारे यांनी भरघोस कार्य केलेले आहे. आगामी कार्तिकी एकादशी पर्यंत विजय शिवतारे हे राज्य सरकारमध्ये मंत्रीपदी असतील असा विश्वास शिवसेनेच्या नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केला.
या आधीच्या सरकारने शेतकऱ्यांना फसवी वीज माफी दिली होती मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांची वीज माफी करून त्यांना न्याय देण्याचे काम केलेले आहे. या भागातील तीर्थक्षेत्र जेजुरी देवस्थानचा विकास त्यासोबतच पालखी महामार्गाचे रस्ता रुंदीकरण करून प्रशस्त महामार्ग केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून करण्यात आला आहे. पानंद रस्त्यांचे रुंदीकरण करण्याचे आश्वासन महायुती सरकारने दिलेले आहे. शेतकऱ्यांचा माल खराब होऊ नये याकरिता गोदामे उभारण्याचा प्रकल्प हाती घेतलेला आहे. लाडकी बहीण योजना, वयोश्री योजना, मोफत बसह प्रवास, तीर्थक्षेत्र दर्शन यांसह अनेक हितकारक योजना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यांमध्ये राबविल्या आहेत. महिलांना सक्षम करण्याचे काम खऱ्या अर्थाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.
या गावभेटीदरम्यान गावकऱ्यांनी ज्या मागण्या केलेल्या आहेत त्या आगामी काळात निश्चितपणे पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध असल्याचा शब्द विजय शिवतारे यांनी दिला. याप्रसंगी शिवसेना पुरंदर तालुका प्रमुख निलेश जगताप, बाळासाहेब देवकर, उद्धव पाटील, उषा पवार यांसह मोठ्या संख्येने महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते.