ऑनलाइन शिक्षण घेऊन बोगस पदवी मिळणार असेल तर, त्याऐवजी देशी दारूच्या दुकानाचा परवाना द्या!,विद्यार्थ्यांने लिहीले उदय सामंतांना पत्र

नांदेड – कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा १५ फेब्रुवारीपर्यंत राज्यातील सर्व महाविद्यालये बंद ठेवण्याचे आदेश राज्य सरकारकडून देण्यात आले असून पुन्हा एकदा ऑनलाइन शिक्षणाला प्राधान्य देण्यात आले आहे. अशातच आता मराठवाडा विद्यापीठातील माध्यमशास्त्र संकुलात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांने थेट उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांना पत्र लहून अजब मागणी केली आहे.
ऑनलाइन शिक्षण घेऊन बोगस पदवी मिळणार असेल तर त्याऐवजी देशी दारूच्या दुकानाचा परवाना द्या, अशी मागणी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील माध्यमशास्त्र संकुलात शिक्षण घेत असणारा विद्यार्थी पवन जगडमवार याने उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडे केली आहे. नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्यांमार्फत त्याने हे पत्र पाठवलं आहे.
‘ऑनलाइन शिक्षण लादले जात आहे. ऑनलाइन वर्गात ४० विद्यार्थ्यांची संख्या असेल तर आठ ते दहाच विद्यार्थी त्यावर उपस्थित असतात. बाकी विद्यार्थ्यांकडे चांगले मोबाईल नाहीत. ग्रामीण भागात इंटरनेट सेवाही नीट नाही. अनेक ठिकाणी नेटवर्कच येत नाही. कधी लाईटच नसते. अशा स्थितीमध्ये शिक्षण कसे घ्यायचे?’, असा प्रश्न जगडमवार याने उपस्थित केला आहे. ऑनलाइन शिक्षणामुळे गोरगरीब विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसानही होत आहे असं त्याने पत्रात नमूद केले आहे.





