महाराष्ट्रमुंबई

ठाणे जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविण्यासाठी कार्यवाही करावी – मंत्री जयकुमार गोरे

मुंबई : ठाणे जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांतील वर्ग खोल्यांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्याची कार्यवाही करण्यात यावी, असे निर्देश ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांनी दिले. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसह शाळेतील गुणवत्तापूर्ण व्यवस्थापनासाठी सीसीटीव्ही उपयुक्त ठरेल, असेही त्यांनी सांगितले.

ग्रामविकास मंत्री गोरे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात यासंदर्भात बैठक झाली. या बैठकीस आमदार किसन कथोरे, आमदार सुरेश म्हात्रे, आमदार सुलभा गायकवाड, ग्रामविकास विभागाचे सचिव एकनाथ डवले, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, उपसचिव प्रशांत पाटील यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.

मंत्री गोरे यांनी सांगितले की, जिल्हा परिषद शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवल्याने विद्यार्थ्यांची सुरक्षा, उपस्थिती व शैक्षणिक शिस्त यामध्ये सकारात्मक बदल होईल. सीसीटीव्ही बसवण्यासाठी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडून नियोजन करण्यात यावे. ठाणे जिल्हा परिषदेने राबविलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांचे कौतुक करत त्यांनी प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर भर देण्याचे आवाहन केले. तसेच, जिल्ह्यातील विविध विकास कामांसाठी आवश्यक निधीची तरतूद करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. प्रशासनातील विभागीय चौकशा वेळेत पूर्ण व्हाव्यात यासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यांना सूचना दिल्या जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

शाळांचे दुरुस्ती कामे प्राधान्याने पूर्ण करावीत, त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल, असेही त्यांनी नमूद केले. आरोग्य, शिक्षण, रस्ते विकास आणि आवास योजना या बाबींमध्ये ठाणे जिल्ह्यात उल्लेखनीय काम होत असून, येत्या काळात उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी अधिक गतीने काम करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!