कुर्ल्याच्या गांधी मैदानात जिल्हास्तरीय शिवछत्रपती करंडक कबड्डी स्पर्धा उत्साहात संपन्न
अ गटात अंबिका सेवा मंडळ तर ब गटात पंढरीनाथ कबड्डी संघाने विजेतेपद पटकावले
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून मुंबई उपनगर जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने खेळासाठी राखीव गांधी मैदान, कुर्ला येथे दोन दिवसीय जिल्हास्तरीय शिवछत्रपती करंडक कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत अ गटात अंबिका सेवा मंडळ तर ब गटात पंढरीनाथ कबड्डी संघाने विजेतेपद पटकावले.
शनिवारी स्पर्धेची जोरदार सुरुवात झाली आणि रविवारी अंतिम सामन्यांमध्ये कबड्डीचा थरार अनुभवायला मिळाला. अंतिम फेरीत ब गटात पंढरीनाथ कबड्डी संघाने हनुमान क्रीडा मंडळावर विजय मिळवत करंडक जिंकला, तर अ गटात अंबिका सेवा मंडळाने भादवे अकॅडमीचा पराभव करत विजेतेपद मिळवले. उत्कृष्ट पकड आणि उत्कृष्ट चढाई यासाठी विशेष वैयक्तिक पुरस्कार देखील देण्यात आले.
स्पर्धेचे पारितोषिक वितरण आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली, ज्येष्ठ पत्रकार अनुराग त्रिपाठी, शिवसेना (शिंदे गट) उपविभाग प्रमुख उमेश मोरे, उबाठा गटाचे विभाग संघटक एड. सुधीर खातू, कुर्ला नागरिक सहकारी बँकेचे उपाध्यक्ष माधव गडदे, अजय शुक्ला, सामाजिक कार्यकर्ते एड. प्रणिल गाढवे, मनसे महिला विभाग संघटिका मंगला नायकवडी, डिंपल छेडा तसेच स्पर्धा आयोजक जय शंकर चौक क्रीडा मंडळाचे अध्यक्ष रुपेश पवार आणि गौरी शंकर क्रीडा मंडळाचे अध्यक्ष अमित कांबळे, प्रमुख मार्गदर्शक विश्वास कांबळे, संजय घोणे यांच्या उपस्थितीत पार पडले.
या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी अतुल चव्हाण, प्रतीक गाढवे, मनीष मोरे, निलेश झंजे, अविनाश महाडिक, रामचंद्र माने, विश्वास कांबळे, संजय घोणे, कैलास पाटील, प्रशांत हाडके, मोहन घोलप, रुपेश प्रभाळे यांनी विशेष मेहनत घेतली.