तिलारी धरणाच्या दुरुस्ती व संलग्न कामांसाठी ३५ कोटी रुपयांच्या प्रस्तावाला मंजुरी-पालकमंत्री उदय सामंत

सिंधुदुर्गनगरी (राजन चव्हाण): तिलारी धरणाच्या नादुरुस्त कालव्यांची दुरुस्ती धरण परिसरातील अंतर्गत रस्त्यांची दुरुस्ती,धरणाची डागडुजी आदी कामे पूर्ण करण्यासाठी सुमारे ३५ कोटी रुपयांच्या प्रस्तावाला पाटबंधारेमंत्री जयंत पाटील यांनी तत्वतः मंजुरी दिली असल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली.
तिलारी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात परवा मुसळधार पाऊस झाला.परिणामी धोक्याची पातळी वाढल्याने पाण्याचा मोठया प्रमाणावर विसर्ग करावा लागला. त्यातच धरणाचे काही कालवे नादुरुस्त व फुटलेले असल्याने आसपासच्या अनेक गावांमध्ये पाणी घुसले आणि पूरस्थिती निर्माण झाली. हे लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे सामंत म्हणाले.
तिलारी परिसरात दळणवळण व संपर्क सुरू रहावा,आसपासच्या गावातील लोकांना वेळोवेळी पूर्व सूचना मिळावी यासाठी लवकरच वायरलेस यंत्रणा बसविण्यात येणार असून पाटबंधारे विभागातील कर्मचाऱ्याना ‘ वॉकी- टॉकी ‘ देण्यात येणार असल्याची माहिती सामंत यांनी यावेळी दिली.या कामासाठी एक कोटी १० लाख रुपये मंजूर करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
सामंत यांनी आज पूरग्रस्त खारेपाटण कणकवली तालुक्यातील काही भागाची पहाणी केली.त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत त्यांनी अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले.
जिल्ह्यात पुरामुळे जे नुकसान झाले आहे त्याची सर्व माहिती येईपर्यंत आपत्कालीन कामांसाठी जिल्हा नियोजन मधून ५ कोटी रुपये तात्काळ मंजूर करण्यात आले असल्याचे ते म्हणाले.
कणकवली तालुक्यातील कनेडी येथील मल्हारी पूल कोसळल्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद झाली असून या ठिकाणी नवीन पूल उभारण्याच्या प्रस्तावाला सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी मंजुरी दिली आहे.या पुलासाठी ५ कोटी १० लाख रुपये खर्च येणार असून पुढील पावसाळ्यापूर्वी हा पूल तयार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत अशी माहिती त्यांनी दिली.दरम्यानच्या काळात रस्त्यावर वहातूक सुरू रहावी म्हणून पर्यायी रस्ता तात्काळ करावा यासाठी २५ लाख रुपये मंजूर करण्यात आल्याचे ते म्हणाले.
खारेपाटण येथे दरवर्षी पूर येतो हे लक्षात घेऊन पाणी जाण्याचे मार्ग तयार करण्यास तसेच पर्यायी मार्ग व जवळच एक उंचवटा, घाटी तयार करण्यास सांगण्यात आले असून पर्यायी मार्गासाठी ५० लाख रुपये मंजूर करण्यात आल्याचे ते म्हणाले.
जिल्ह्यात काही भागात धूप प्रतिबंधक बंधारे बांधणे,नद्या, वहाळ आदी ठिकाणचे गाळ काढण्याबाबत विचार सुरू असून ग्रामपंचायती किंवा अन्य कोणी हा गाळ स्वखर्चाने काढून नेत असतील तर अशांना परवानगी देण्यात येईल असे सामंत यांनी सांगितले.
जिल्ह्यातील नादुरुस्त साकव, रस्ते यांची यादी तयार करण्यास जि.प.बांधकाम व सार्वजनिक बांधकाम यांना सांगण्यात आले आहे.
भुईबावडा घाटाच्या रस्त्याला फार मोठया भेगा पडल्या असून तो इतक्यात सुरू होणार नाही.याबाबत तज्ज्ञांचे मत घेऊन निर्णय घेतला जाईल.करूळ घाटातही मोठया प्रमाणात दरडी कोसळत असून याबाबतीत तज्ज्ञांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल असे सामंत यांनी सांगितले.
पुरामुळे शेतीचेही मोठया प्रमाणावर नुकसान झाले असून पंचनामे होताच त्यांना कशा प्रकारे मदत देता येईल ते बघू असे त्यांनी सांगितले.
या पावसाळ्यात कणकवली व पावशी(कुडाळ) अशा दोन ठिकाणी ‘हायवे ‘वर पाणी आल्याने त्यांची कारणे काय हे तपासून पहाण्याच्या सूचना हायवे अधिकाऱ्यांना देण्यात आल्या असून आपण केंद्रीयमंत्री नितीन गडकरी।यांनाही पत्र लिहून त्यांचे या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यात येईल असे ते म्हणाले.
जिल्ह्यातील अनेक मोऱ्या व छोटे पूल हे सखल असल्याने त्यावरून पाणी जाते आणि वाड्यावाड्या आणि गावांचा संपर्क तुटतो.अशा किती मोऱ्या व पूल आहेत याची माहिती आपण संबंधित विभागाकडे मागितली असून या मोऱ्या व पूल उंच करण्याबाबत निधी उपलब्ध करून देण्यात येईल असे ते म्हणाले.