महाराष्ट्र

उत्तराखंडमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांसाठी उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा पुढाकार

मुंबई : उत्तराखंडमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांच्या मदतीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपला मदतीचा हात पुढे केला आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांच्याशी फोनवरून संवाद साधून त्यांनी उत्तराखंडमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना मदत करण्याची विनंती केली होती. त्यानंतर तत्काळ एनडीआरएफच्या पथकाने धाव घेवून या पर्यटकांना सुरक्षित ठिकाणी हलवले आहे.

देवभूमी उत्तराखंडमध्ये गेल्या काही दिवसांपासून पावसाने थैमान घातले आहे. याठिकाणी ढगफुटी अदृश्य पाऊस पडल्याने नद्यांना प्रचंड पूर आला असून दरडी कोसळून वाहतुकीचे रस्ते बंद झाले आहेत. उत्तराखंडमधील यमुनोत्री धामच्या जानकीचट्टी गावात २८ जूनपासून राज्यातील सुमारे १५० पर्यटक अडकून पडले होते. परतीच्या मार्गावर दरड कोसळून रस्ते वाहून गेल्याने त्यांना परत येता येत नव्हते. परिस्थिती पूर्वपदावर येण्यासाठी अजून आठ दिवस लागण्याची शक्यता प्रशासनाकडून व्यक्त केली जात होती. तिथे अडकलेल्या पर्यटकांनी आपल्यापर्यंत मदत पाठवण्याची आणि आपल्याला सुखरूप ठिकाणी हलवण्याची विनंती महाराष्ट्र शासनाकडे केली होती. त्यांनी मदतीसाठी दिलेल्या सादेला तात्काळ प्रतिसाद देत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या पर्यटकांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला. आज सकाळी त्यांनी उत्तराखंडच्या मुख्यमंत्री कार्यालयाशी संपर्क साधून या पर्यटकांना मदत करण्याची विनंती केली होती. त्यानंतर काही वेळात मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांच्याशीही फोनवरून संवाद साधत त्यांनी राज्यातील पर्यटकांपर्यंत मदत पोहचवण्याची विनंती केली होती.

यानंतर तत्काळ एनडीआरएफची पथके घटनास्थळी रवाना करण्यात आली. एनडीआरएफच्या जवानांनी यमुनोत्री धामच्या जानकीचट्टी गावात अडकलेल्या पर्यटकांना सुखरूपरित्या सुरक्षित ठिकाणी हलवले. या नंतर या पर्यटकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी फोनवरून संवाद साधत केलेल्या मदतीसाठी आभार मानले. तसेच आपल्याशी फोनवरून बोलल्यानंतर वेगाने चक्र फिरून अवघ्या काही तासात आपली सुटका झाल्याचे सांगत त्यांनी वेळीच मदत पोहचवल्याबद्दल उपमुख्यमंत्री शिंदे आणि महाराष्ट्र शासनाचे आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!