देशविदेशनवी दिल्लीमहाराष्ट्र

मोठी बातमी! मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी स्वीकारले ‘इंटरनॅशनल IDEA’चे अध्यक्षपद….

मुंबई: भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार यांनी ३ डिसेंबर २०२५ रोजी, ‘इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर डेमोक्रसी अँड इलेक्टोरल असिस्टन्स’ (International IDEA) या संस्थेच्या सदस्य राष्ट्रांच्या परिषदेचे (Council of Member States) अध्यक्षपद सन २०२६ वर्षासाठी स्वीकारले आहे.

इंटरनॅशनल IDEA च्या संस्थापक सदस्यांपैकी एक असलेल्या भारताने या संस्थेच्या प्रशासनामध्ये, लोकशाही चर्चासत्रांमध्ये आणि संस्थात्मक उपक्रमांमध्ये सातत्याने योगदान दिले आहे. स्वीडनची राजधानी स्टॉकहोम येथे झालेल्या या कार्यक्रमात ज्ञानेश कुमार यांचे स्वागत स्वीडनमधील भारताचे राजदूत  अनुराग भूषण यांनी केले. यावेळी त्यांनी IIDEA चे सरचिटणीस डॉ. केविन कासा-झामोरा यांच्याशीही चर्चा केली.

अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारताना आपल्या भाषणात CEC ज्ञानेश कुमार यांनी जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचा अनुभव कथन केला. त्यांनी माहिती दिली की भारतात २८ राज्ये आणि ८ केंद्रशासित प्रदेशांमध्ये ९० कोटींहून अधिक मतदार आहेत. तसेच, २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत ६ राष्ट्रीय आणि ६७ राज्य पक्षांसह ७४३ राजकीय पक्षांमधून २०,००० हून अधिक उमेदवारांनी भाग घेतला. या संपूर्ण प्रक्रियेत २० लाखाहून अधिक निवडणूक कर्मचारी कार्यरत होते.

CEC ज्ञानेश कुमार यांनी ठामपणे सांगितले की, भारताचे अध्यक्षपद ‘निर्णायक, महत्त्वाकांक्षी आणि कृती-केंद्रित’ असेल. त्यांच्या अध्यक्षपदाची मुख्य संकल्पना “समावेशक, शांततापूर्ण, लवचिक आणि शाश्वत जगासाठी लोकशाही” ही असणार आहे. यामध्ये भविष्यासाठी लोकशाहीची पुनर्कल्पना (Reimagining Democracy) आणि शाश्वत लोकशाहीसाठी स्वतंत्र निवडणूक व्यवस्थापन संस्था (Independent & Professional EMBs) या दोन प्रमुख स्तंभांवर लक्ष केंद्रित केले जाईल.

भारत, लोकशाहीची जननी म्हणून, जगातील सर्वात मोठी, वैविध्यपूर्ण आणि समावेशक लोकशाही म्हणून आपले अनुभव, मूल्ये आणि तत्त्वे जगासोबत सामायिक करण्यास उत्सुक असल्याचे त्यांनी नमूद केले. जगभरातील लोकशाही अधिक समावेशक, शांततापूर्ण, लवचिक आणि शाश्वत व्हाव्यात, यासाठी प्रत्येक मताला महत्त्व मिळेल आणि प्रत्येक आवाजाची दखल घेतली जाईल याची खात्री करण्याचा भारताचा प्रयत्न राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या वर्षासाठी मॉरिशस आणि मेक्सिको हे देश इंटरनॅशनल IDEA परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळतील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!