शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कुणाचा? महापालिका निवडणुकीपूर्वी लागणार निकाल!

मुंबई : शिवसेना हे पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. दोन वर्षांपासून हे प्रकरण प्रलंबित आहे. याच पार्श्वभूमीवर, ठाकरे सेनेने हे प्रकरण आज (२ जुलै) पुन्हा सर्वोच्च न्यायालयात मेंशन केलं. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना पक्ष व चिन्हावर लवकर निर्णय घ्यावा, अशी विनंती कोर्टाकडे करण्यात आली. शिवसेना उद्भव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वकीलानी कोर्टात याबाबत मेंशनिंग करताना सांगितले की, गेल्या दोन वर्षांपासून प्रकरण प्रलंबित आहे. आता स्थानिक निवडणुका जवळ आल्या आहेत. त्यामुळे त्याआधी पक्ष आणि चिन्हावरचा निर्णय आवश्यक आहे.
यावर सुप्रीम कोर्टाने सांगितले की, १६ जुलै रोजी हे प्रकरण आधीच बोर्डवर आहे. त्या दिवशीच सुनावणी होईल. कोर्टाने लवकरच सुनावणीची तारीख निश्चित करण्याचे आश्वासन दिले आहे. २०२२ मध्ये एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेना दोन गटात विभागली. ठाकरे गट आणि शिंदे गट दोघांनीही शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्हावर दावा केला. निवडणूक आयोगाने फेब्रुवारी २०२३ मध्ये शिंदे गटाला शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह दिले. याविरोधात उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. तेव्हापासून हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.