महाराष्ट्र

नरेंद्र मोदी भ्रष्ट लोकांचे सरदार, नाना पटोलेंची खोचक टीका

नागपूर – शिवसेनेचे (शिंदे गट) उत्तर पश्चिम लोकसभेचे खासदार रवींद्र वायकर यांना मुंबई पोलिसांकडून क्लीन चिट देण्यात आली आहे. कथित जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणी वायकर यांना हा मोठा दिलासा देण्यात आला आहे. ज्यामुळे आता राजकीय वातावरण देखील तापले आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी वायकरांना क्लीन चिट मिळाल्यामुळे सरकारवर निशाणा साधलेला असतानाच आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही या प्रकरणावरून सरकारला चपराक लगावली आहे. भाजपाच्या वॉशिंगमशीन मधून वायकरांना स्वच्छ केल्याचे आणखी एक प्रकरण, असे म्हणत नाना पटोले यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

शिवसेना खासदार रविंद्र वायकर यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप असताना मुंबई पोलिसांनी त्यांना क्लीन चिट देणे म्हणजे भाजपाच्या वॉशिंगमशीन मधून वायकरांना स्वच्छ केल्याचे आणखी एक प्रकरण आहे. मोदी सरकार हे ईडी व सीबीआय या दोन कार्यकर्त्यांच्या मार्फत राजकारण कसे करते हे देशाने पाहिले आहे. अशी एखादी घटना समजू शकतो पण अनेक उदाहरणे आहेत, वायकर त्यातील एक प्रकरण आहे. नरेंद्र मोदी हे देशातील भ्रष्ट लोकांचे सरदार आहेत, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.
नागपूरमध्ये प्रसार माध्यमांशी बोलताना नाना पटोले पुढे म्हणाले की, वायकर प्रकरणावर फारसे बोलण्यात काही अर्थ नाही. लोकसभा निवडणुकीआधी पक्ष बदलून ते सत्ताधारी पक्षाबरोबर गेले तेव्हाच त्यांनी सांगितले होते. त्यामुळे मुंबई पोलिसांनी त्यांना क्लीन चिट देऊन फाईल बंद केली यात नवल वाटण्यासारखे काही नाही, असे नाना पटोले म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!