दिंडोशी विधानसभा क्षेत्रातील अपुऱ्या पाणीपुरवठ्यास राज्य शासन आणि महापालिका प्रशासन जबाबदार ! – आमदार सुनिल प्रभु
जन प्रक्षोभाचे नेतृत्व करण्याचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा इशारा

मुंबई : गणेशोत्सवानंतर मुंबईच्या उत्तर उपनगरातील विविध भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून तीव्र पाणीटंचाई जाणवत होती. कुरारगाव दिंडोशी, नागरी निवारा, संतोष नगर, पिंपरीपाडा, कोकणी पाडा, दत्तवाडी, बाणडोंगरी, तानाजी नगर, क्रांतीनगर, महाराष्ट्र नगर आणि आप्पा पाडा या परिसरांमध्ये नागरिकांना पाण्याचा अत्यल्प व कमी दाबाने होणारा पुरवठा मिळत असल्यामुळे प्रचंड गैरसोयींचा सामना करावा लागत होता. दिंडोशी विधानसभा क्षेत्रातील अपुऱ्या पाणीपुरवठ्यास राज्य शासन आणि महापालिका प्रशासन जबाबदार असल्याचे मत आमदार सुनिल प्रभु यांनी व्यक्त केले स्थानिक पातळीवर सातत्याने पाठपुरावा करूनही कोणताही ठोस निर्णय न झाल्यामुळे आज मुंबई महानगरपालिकेचे उपायुक्त तसेच जल अभियंता माळवदे यांच्यासमवेत वरळी येथील इंजिनिअरिंग हब मुख्य कार्यालयात विशेष बैठक घेण्यात आली.
या बैठकीत नागरिकांच्या तक्रारी व समस्या मांडण्यात आल्या. बैठकीदरम्यान खालील महत्त्वाचे मुद्दे चर्चिले गेले:
तात्काळ पाणीपुरवठा वाढविणे – नागरिकांना अत्यावश्यक सोयीसाठी सध्या उपलब्ध स्त्रोतांतून पुरेसा आणि नियोजित वेळेत पाणीपुरवठा करण्याचे निर्देश अभियंत्यांना देण्यात आले.
संतोष नगर – ए वन बेकरी येथील नवी पाण्याची टाकी – या भागातील सततची टंचाई कमी करण्यासाठी पाण्याची टाकी उभारण्याच्या प्रस्तावाचा आढावा घेऊन पुढील कार्यवाही गतीमान करण्याबाबत निर्णय घेण्यात आला.
अप्पा पाडा – नवे पंपिंग स्टेशन – महाराष्ट्र नगर व आजूबाजूच्या परिसरातील कायमस्वरूपी पाणीटंचाई दूर करण्याच्या दृष्टीने अप्पा पाडा येथे पंपिंग स्टेशन उभारण्याबाबत सविस्तर चर्चा झाली. यासाठी जागा उपलब्ध करून देण्याचा आणि तांत्रिक प्रक्रिया तातडीने सुरू करण्याचा निर्णय झाला.
नागरिकांच्या तात्काळ मागण्यांची पूर्तता – तातडीच्या स्वरूपात आवश्यक उपाययोजना न झाल्यास जनआंदोलनाचा इशारा देण्यात आला. प्रशासक म्हणून महानगरपालिकेने जबाबदारी स्वीकारून त्वरित पाणीपुरवठा वाढविणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले. तात्काळ पाणीपुरवठा मुबलक प्रमाणात करण्याबाबत जबाबदारी प्रशासक म्हणून महानगरपालिकेची अन्यथा जन प्रक्षोभाचे नेतृत्व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट करेल त्यासाठी तयार रहावे असा इशारा अधिकाऱ्यांना देण्यात आला. या बैठकीला शिवसेना नेते आमदार सुनील प्रभू, माजी उपमहापौर सुहास वाडकर, माजी स्थापत्य समिती अध्यक्ष तुळशीराम शिंदे, तसेच विभागातील उपविभाग प्रमुख प्रदीप निकम आणि स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीदरम्यान नागरिकांचा आवाज प्रामाणिकपणे मांडण्यात आला व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गंभीरतेने लक्ष घालून तातडीने आवश्यक पावले उचलण्याचे आश्वासन दिले.