दुर्मीळ गिधाडांचे महाराष्ट्रात आगमन; खारेपाटणमध्ये आढळले युरेशियन ग्रिफॉन!

रत्नागिरी प्रतिनिधी:खारेपाटण येथे दुर्मीळ युरेशियन ग्रिफॉन प्रजातीची स्थलांतरित गिधाडे विहार करत असल्याचे निदर्शनास आले आहे. खारेपाटण मच्छी मार्केट परिसरात ही गिधाडे आढळून आली. खारेपाटण गावामध्ये सुख नदीच्या काठावर मच्छी मार्केट परिसरात कुक्कुटपालनातील कचरा आणि मासळीचे उरलेले अवयव उघड्यावर टाकले जातात. त्यावेळी घार, बगळे, कावळे घिरट्या घालत असतात. याचदरम्यान उंचावरून आलेल्या या गिधाड्यांच्या मागे कावळे लागले होते. त्यातील दोन गिधाडे इमारतीच्या छतावर उतरल्याचे स्थानिकांनी सांगितले.
छायाचित्रकार रमेश जामसांडेकर यांनी घटनास्थळी दाखल होऊन त्यातील एका गिधाडाचे छायाचित्र टिपले. त्यानंतर हे गिधाड सुख नदीच्या पलीकडील डोंगराच्या दिशेने उडत गेले. सोशल मीडियावर या गिधाडाचे फोटो टाकून पक्षी वन्यजीव गिधाड की घार यांची विचारणा करण्यात आली. मुंबईतील पर्यावरण वन्यजीव म्हणून कार्यरत असलेले प्रतिनिधी अभ्यासक अक्षय मांडवकर यांनी फोटोग्राफ मागून घेतले. अखेर युरेशियन ग्रिफॉन गिधाड असल्याचे सांगितले.




