मिरा रोड व्यापाऱ्यांच्या मोर्च्याला मराठी माणसांच्या भव्य मोर्चाने दिले सणसणीत उत्तर..

ठाणे : मराठी अस्मिता आणि मराठी भाषेच्या मुद्द्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना यांनी मीरा-भाईंदरमध्ये आज सकाळी मोर्चाचे आयोजन केले होते . हा मोर्चा सकाळी 10 वाजता बालाजी हॉटेलपासून सुरू होऊन मिरा रोड स्टेशनपर्यंत जाणार होता . मात्र, पोलिसांनी मोर्चापूर्वीच मनसे आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांना नोटिसा बजावल्या.
आज पहाटे 3:30 वाजता मनसे ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना ताब्यात घेतले. वसई-विरारमधील इतर काही पदाधिकाऱ्यांवरही प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर मीरा-भाईंदर येथील सामान्य मराठी माणूस रस्त्यावर उतरला आणि प्रचंड अश्या मार्चला सुरुवात झाली.
सुरवातीला मोर्चा ला परवानगी नाकारणाऱ्या पोलिसांना नागरिकांचा संताप पाहता परवानगी द्यावी लागली.
या मुळे मीरा-भाईंदरमधील वातावरण तणावपूर्ण झाले होते. ज्याचे परिवहन मंत्री तथा स्थानिक आमदार प्रताप सरनाईक देखील मोर्चात सामील झाले, मात्र संतापलेल्या नागरिकांनी सरनाईक याना परत जा, पन्नास खोके एकदम ओके अश्या घोषणा देऊ लागले, त्यातच नागरिकांकडून सरनाईक यांच्यावर पाण्याची बाटली फेकून मारली. एकंदर परिस्थिती पाहून पोलिसांनी सरनाईक याना बंदोबस्तात बाहेर काढले.
इकडे तणावाची परिस्थिती पाहून मनसे चे संदीप देशपांडे, नितीन सरदेसाई आदींनी ट्रेन पकडून मीरा रोड ला धाव घेतली आणि जो पर्यंत अविनाश जाधव याना सोडत नाही, तो पर्यंत मोर्चा मागे हटणार नाही असे सांगितले अखेर संतप्त मोर्चा आणि नागरिकांचा रोष पाहता पोलिसांनी अविनाश जाधव यांना सोडले.
दरम्यान, या कारवाईवर शिवसेना (शिंदे गट) नेते आणि मंत्री प्रताप सरनाईक यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले, पोलिसांनी एका पक्षासाठी काम करू नये. मी याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पोलीस आयुक्तांशी बोललो असून, माझा निषेध नोंदवला आहे. गृहखात्याचे कोणतेही आदेश नसताना पोलिसांनी कुणाच्या सांगण्यावरून ही धरपकड केली, याची चौकशी करत आहोत. सरनाईक यांनी पुढे प्रश्न उपस्थित केला की, व्यापाऱ्यांना मोर्चा काढण्याची परवानगी दिली जाते, मग मराठी एकीकरण समितीच्या मोर्चाला का अडवले? या कारवाईमुळे महायुती सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी याबाबत चर्चा करणार असल्याचे सांगितले आणि मीरा-भाईंदरमधील पोलिसांची कारवाई अत्यंत चुकीची असल्याचा थेट आरोप केला.






