२०२४ पासून मोदी सरकारची उलटी गंगा वाहायला सुरुवात होईल,संजय राऊतांचा इशारा

नवी दिल्ली – राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून विरोधक सतत महाविकास आघाडीवर टीका करताना दिसून येत आहे. या टीकेला शिवसेना खासदार संजय राऊत सुद्धा सडेतोड प्रतिउत्तर देताना दिसून आले आह अशातच आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नवी दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी लखीमपूर खेरी, उत्तर प्रदेश निवडणूक, महाराष्ट्र सरकार, विधिमंडळाचं अधिवेशन ओमिक्रॉन अशा विविध विषयावर भाष्य केलं.
पुढे बोलताना राऊत म्हणाले की, लखीमपूर खेरी प्रकरणी आम्ही काल मार्च काढला होता. राहुल गांधी यांनी त्यावेळी सांगितलं की काही झालं तरी आम्ही तुरुंगात पाठवल्याशिवाय राहणार नाही. शेतकरी आंदोलनाचा इतिहास पाहता हे अशक्य नाही. राहुल गांधीचा हा आत्मविश्वास पाहता उत्तर प्रदेशात सत्ताबदल होतोय, त्यापाठोपाठ केंद्रातही सत्ता बदल होणार आहे, असं संजय राऊत म्हणाले.
तसेच पुढे बोलताना राऊत म्हणाले की, उत्तर प्रदेशात राजकीय परिवर्तन होईल, असं वातावरण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, देशाचे गृहमंत्री तिथं आठ आठ दिवस मुक्काम टाकून का बसलेले आहेत,असा सवाल संजय राऊत यांनी केला. पश्चिम बंगालमध्येही त्यांनी असाच डेरा टाकला होता. पण त्यांचा पराभव झाला होता, असं संजय राऊत म्हणाले.