धक्कादायक: अतुल परचुरे यांचे निधन:अवघ्या 57 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मुंबई – मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते अतुल परचुरे यांचे निधन झाले आहे. निधना समयी त्यांचे वय 57 होते. काही वर्षांपूर्वी अतुल परचुरे यांना कॅन्सरचे निदान झाले होते. त्यांनी कॅन्सरवर मात करत ते ठणठणीत बरेही झाले होते. तब्येत सुधारल्यानंतर अतुल परचुरे यांनी पुन्हा कामालाही सुरुवात केली होती. मात्र, आज त्यांची प्राणज्योत मालवली आहे. त्यांच्या पश्चात त्यांची आई, पत्नी आणि मुलगी असं कुटुंब आहे. अतुल परचुरे यांच्या निधनानंतर मराठी सिनेविश्वावर शोककळा पसरली आहे.
नुकतीच त्यांनी ‘सूर्याची पिल्ले’ या नाटकाची घोषणाही केली होती. जोमाने काम सुरु केलं होतं. मात्र तब्येतीने त्यांची साथ दिली नाही. दरम्यान त्यांनी जगाचा निरोप घेतला आहे. कलाविश्वातील हरहुन्नरी अभिनेता आपल्यातून हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.
अतुल परचुरे यांचा जन्म 30 नोव्हेंबर 1966 रोजी मुंबईत झाला होता. त्यांच्या पत्नी सोनिया परचुरे या देखील मनोरंजन क्षेत्राशी निगडीत आहेत. परचुरे यांनी नाटक, सिनेमा आणि मालिका या तिन्ही प्रकारात काम करून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. तसेच त्यांनी हिंदी चित्रपटात देखील काम केले आहे. कापूसकोंड्याची गोष्ट, वासूची सासु, प्रियतमा, गेला माधव कुणीकडे, तरुण तुर्क म्हातारे अर्क, तुझं आहे तुजपाशी, नातीगोती, टिळक आणि आगरकर, व्यक्ती आणि वल्ली या प्रसिद्ध नाटकांमध्ये काम केले होते. व्यक्ती आणि वल्ली या नाटकात पु. ल. देशपांडे यांची भूमिका अतुल परचुरे यांनी साकारली होती. पु.ल. देशपांडे यांनी ती पाहिली आणि त्यांना शाबासकी दिली होती.
‘झी मराठी’ वाहिनीवरील अळी मिळी गुपचिळी, होणार सून मी ह्या घरची, जागो मोहन प्यारे, भागो मोहन प्यारे या मालिकांमध्ये त्यांनी प्रमुख भूमिका साकारली होती. ‘जागो मोहन प्यारे’ मालिकेतील त्यांच्या भूमिकेवर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केले.
याशिवाय त्यांनी हिंदी चित्रपटांमध्येही काम केले होते. सलाम-ए-इश्क, पार्टनर, ऑल द बेस्ट: फन बिगिन्स, खट्टा मीठा, बुढ्ढा होगा तेरा बाप अशा हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले.
अतुल यांनी पूर्वी एका मुलाखती दरम्यान सांगितलं होतं की, यकृतामध्ये 5 सेंटीमीटर लांबीची कर्करोगाची गाठ असल्याचं डॉक्टरांनी त्यांना सांगितलं होतं. त्यावर डॉक्टरांनी त्यांची तब्येत ठीक होईल असं सांगितलं. मात्र, उपचार सुरू असताना त्यांच्यावर विपरीत परिणाम झाला. सुरुवातीला आजार न दिसल्यामुळे त्यांच्या स्वादुपिंडावर परिणाम झाला आणि चुकीच्या उपचारांमुळे आणखीनच त्यांची परिस्थिती बिकट झाली होती. अशातच डॉक्टरांनी त्यांना दीड महिना वाट पाहायला सांगितली होती. मात्र, अतुल यांनी डॉक्टर बदलले आणि योग्य उपचार सुरू केले होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अभिनेता अतुल परचुरे यांना श्रद्धांजली, अभिनय संपन्न गुणी कलाकाराला मुकलो
हरहुन्नरी, अभिनय संपन्न अभिनेते अतुल परचुरे यांची अकाली एक्झिट मनाला चटका लावून जाणारी आहे. त्यांच्या निधनामुळे एका गुणी कलाकाराला आपण मुकलो आहोत, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिनेता अतुल परचुरे यांना श्रद्धांजली वाहिली आहे. शोकसंदेशात मुख्यमंत्री म्हणतात, बालरंगभूमी पासून त्यांची अभिनयाची कारकीर्द सुरू झाली. त्यांनी मराठी रंगभूमीवर आपल्या सहजसुंदर, टवटवीत अभिनयाने छाप उमटवली. मराठी आणि हिंदी अशा दोन्हीतील नाटक, मालिका चित्रपट आणि जाहिरात या क्षेत्रांत त्यांनी ओळख निर्माण केली. शाब्दिक, वाचिक विनोद यांमध्ये त्यांनी अंगभूत गुणांनी रंग भरले. त्यांच्या निधनामुळे एक गुणी, अभिनय संपन्न कलाकाराला आपण मुकलो आहोत. ही कला क्षेत्राची मोठी हानी आहे. परचुरे यांच्या असंख्य चाहत्यांपैकी एक म्हणून मी त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी आहे. ईश्वराने त्यांना हे दु:ख सहन करण्याचं बळ द्यावी अशी प्रार्थना करून मुख्यमंत्र्यांनी ज्येष्ठ अभिनेते अतुल परचुरे यांना श्रद्धांजली वाहिली आहे.