
मुंबई:गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्यांवर करोना चाचणीची किंवा लसीकरणाची अट घालण्याच्या सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयावर मुंबईकर कोकणवासीयांमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी व्यक्त होऊ लागली आहे. एकतर सर्वत्र लसीकरणाचा घोळ सुरु आहे. लस घेण्याची इच्छा असून देखील लस मिळत नाही. गेल्या वर्षी १४ दिवस घरगुती विलगीकरणाची सक्ती किंवा आरटीपीसीआर निगेटिव्ह अहवाल असला तरच गावात प्रवेश करण्याची कठोर अट असल्याने बहुसंख्य चाकरमान्यांनी गावी जायच्या बेतावर पाणी सोडले होते. यंदा कोरोना ची दुसरी लाट ओसरली तरीही आरटीपीसीआर निगेटिव्ह अहवाल किंवा दोन लस घेतल्याचे प्रमाणपत्र असेल तरच गावात प्रवेश देण्याची जाचक अट घालण्यात आलीआहे.
शिवसेनेचा मोठ्या प्रमाणावर बेस हा मुंबईत आहे. तसेच बहुसंख्य कोकणी जनता महापालिकेत शिवसेनेला गेली ३२ वर्षे भरभरून मतदान करीत आहे. मात्र या खेपेस शिवसेनेचा मुख्यमंत्री असून देखील महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यात कुठेही नसलेले निर्बंध कोकणी जनतेवर लावण्यात आल्याने रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात मूळ गाव असणारे चाकरमानी राज्य सरकारवर नाराज असल्याचे चित्र दिसू लागले आहे.याचा मोठा तडाखा शिवसेनेला आगामी महापालिकेच्या निवडणुकीत बसण्याची शक्यता आहे. या पार्श्ववभूमीवर काल रविवारी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी, सध्यातरी अशा अटी घालणे शक्य नसल्याचे स्पष्ट करीत याबाबत तोडगा काढण्याचे सूतोवाच केले आहे.
गणेशोत्सवाकरिता राज्य परिवहन मंडळाने मोठ्या प्रमाणावर एसटी बसेस सोडण्याचे जाहीर केले. रेल्वे ने देखील कित्येक जादा रेल्वेगाड्या जाहीर केल्यानंतर दोन महिने अगोदरच प्रवाश्यानी बस व रेल्वे चे बुकिंग केले आहे. हे सर्व माहित असून देखील गणेशोत्सवाला काही अवघे काही दिवस शिल्लक असतानाच रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात प्रवेश करण्याच्या ७२ तास आधी करोना चाचणी अहवाल बंधनकारक करण्याचा किंवा दोन लसमात्रा घेतलेल्यांनाच कोकणात प्रवेश देण्याचा निर्णय सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांनी नुकताच घेतला. मात्र आता त्याविरोधात प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाल्याने आरोग्यमंत्री टोपे यांना स्पष्टीकरण द्यावे लागले.या बाबत बोलताना राजेश टोपे म्हणाले,”लसीकरण कमी असल्याने दोन लसमात्रा घेतलेल्यांना कोकणात प्रवेश किंवा करोना चाचणी बंधनकारक करणे सध्यातरी शक्य नाही. परंतु याबाबत दोन ते तीन दिवसांत तोडगा काढला जाईल”, अशी माहिती टोपे यांनी दिली. करोनाची लक्षणे वगैरे असतील, तर चाचणी करणे योग्य आहे. दोन लसमात्रा घेतलेल्यांचे प्रमाणही कमीच आहे. त्यामुळे शारीरिक अंतर ठेवणे आणि मास्क बंधनकारक करणे हे नियम योग्य आहेत, असेही टोपे यांनी स्पष्ट केले. सध्या सिंधुदुर्गात करोनाबाधितांचे प्रमाण ३.२४ टक्के आणि रत्नागिरीत २.६५ टक्के आहे.