अर्थसंकल्पात झालेल्या असमान निधी वाटपामुळे शिंदे गट अस्वस्थ ?
भाजप मंत्र्यांच्या विभागाला सर्वात जास्त निधी;त्यानंतर राष्ट्रवादी आणि शेवटी शिंदे शिवसेनेला सर्वात कमी निधी

मुंबई प्रतिनिधी : राज्याच्या अर्थसंकल्पात निधी वाटपावरून महायुतीतील असमतोल समोर आला आहे. भाजपच्या मंत्र्यांच्या विभागांना सर्वाधिक निधी देण्यात आला असून, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्या वाट्याला तुलनेत कमी निधी आल्याने महायुतीतील अस्वस्थता वाढण्याची शक्यता आहे.
अर्थसंकल्पानुसार, भाजपच्या मंत्र्यांना ८९,१२८ कोटींचा निधी मिळाला आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) मंत्र्यांना ५६,५६३ कोटी आणि शिवसेना (शिंदे गट) मंत्र्यांना ४१,६०६ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे महायुतीतील समान वाटपाच्या तत्त्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
निधी वाटपातील असमतोल
राज्यात भाजपचे १२१ आमदार असून, सरकारमधील सर्वात मोठा पक्ष आहे. त्यानंतर शिंदे गटाच्या ५७ आमदारांच्या पाठिंब्यावर सरकार उभे आहे, तर अजित पवार गटाचे ४१ आमदार सरकारच्या स्थिरतेसाठी महत्त्वाचे आहेत. मात्र, निधी वाटपाच्या तुलनेत शिंदे गट आणि अजित पवार गटाला अपेक्षित प्रमाणात वाटा मिळाला नसल्याचे दिसते.
विभागनिहाय निधी वाटप:
भाजप – ₹८९,१२८ कोटी
राष्ट्रवादी (अजित पवार गट) – ₹५६,५६३ कोटी
शिवसेना (शिंदे गट) – ₹४१,६०६ कोटी
महायुतीत वाढू शकते धुसफूस?
निधी वाटपातील असमतोलावरून शिंदे गट आणि अजित पवार गटात नाराजी निर्माण होण्याची शक्यता आहे. विशेषतः शिवसेनेने (शिंदे गट) जास्त मंत्रीपदं असतानाही निधीच्या बाबतीत तिसऱ्या क्रमांकावर राहणे, हा त्यांच्यासाठी धक्कादायक ठरू शकतो. तसेच अजित पवार गटालाही अपेक्षेपेक्षा कमी निधी मिळाल्यामुळे पुढील काळात सरकारमध्ये अंतर्गत मतभेद वाढण्याची चिन्हे आहेत.
या निधी वाटपामुळे महायुतीत समन्वय साधण्याचे मोठे आव्हान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर असेल. पुढील काही दिवसांत यावर प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे.