कोकणात वाटद एमआयडीसी प्रकल्पाविरोधात ग्रामस्थांचा तीव्र विरोध; जनआक्रोश सभेला असीम सरोदे यांची उपस्थिती

रत्नागिरी : कोकणातील प्रस्तावित वाटद एमआयडीसी आणि विनाशकारी प्रकल्पांविरोधात स्थानिकांचा विरोध अधिक तीव्र झाला आहे. याच पार्श्वभूमीवर, वाटद एमआयडीसी विरोधी संघर्ष कृती समिती’ आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्यावतीने शनिवार, दिनांक १९ जुलै २०२५ रोजी सकाळी १० वाजता खंडळा येथील सर्वसाक्षी श्रद्धा प्रतिष्ठानमध्ये एका जनआक्रोश सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेला सर्वोच्च न्यायालयाचे सुप्रसिद्ध वकील आणि मानवाधिकार विश्लेषक अॅड. असीम सरोदे हे प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन करणार आहेत.संघर्ष समितीच्या माहितीनुसार ही जनआक्रोश सभा म्हणजे कोकणातील गरीब शेतकन्यांच्या आणि सामान्य जनतेच्या अस्तित्व आणि हक्काचा आवाज आहे. हा आवाज शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी हे एक प्रभावी माध्यम ठरेल. या सभेच्या माध्यमातून एमआयडीसीची अधिसूचना कायमस्वरूपी रद्द करण्यात यावी, ही प्रमुख मागणी केली जाणार आहे. या कायदेशीर लढ्यात मार्गदर्शन करण्यासाठी अॅड. असीम सरोदे हे विशेष उपस्थित राहणार असून, सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणी दाद मागण्यासाठी त्यांची मदत घेतली जाणार आहे. या सभेला प्रमुख उपस्थित म्हणून शिवराज्य प्रतिष्ठान महाराष्ट्र चे प्रदेशाध्यक्ष अॅड. रोशन पाटील हे देखील मार्गदर्शन करणार आहेत.
सभेचे आयोजन ‘वाटाड एमआयडीसी विरोधी संघर्ष कृती समितीने केले असून, त्यांना खंडळा पंचक्रोशी सामाजिक संस्था आणि ‘शिवराज्य प्रतिष्ठान महाराष्ट्र’ यांचे सहकार्य लाभले आहे. या सभेत संघर्ष समिती अध्यक्ष सहदेव वीर, उपाध्यक्ष संतोष बारगुडे, प्रथमेश गावणकर, उमेश रहाटे, चंद्रकांत धोपट, सुरेश घवाळी, दिनेश धनावडे, ओंकार शितप, अशोक निंबरे, प्रदीप वीर, ओंकार चौगुले, तुकाराम कुलये, आणि सुभाष कुर्ते यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. एकच जिल्हा.. वाटल एमआयडीसी रद्द!’ या घोषणेखाली सर्व निसर्गप्रेमी, शेतकरी आणि कोकणवासीयांना मोठया संख्येने उपस्थित राहून कोकणच्या रक्षणासाठी एकजुटीने सहभागी होण्याचे आवाहन संघर्ष समितीने केले आहे.