महाराष्ट्रदेशविदेश

अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांचे पृथ्वीवर यशस्वी आगमन…

वृत्त संस्था : भारता च्या अंतराळ कार्यक्रमातील सर्वात मोठ्या घटने ची आज इतिहासात नोंद झाली आहे. भारतीय हवाई दलातील स्क्वाड्रन कमांडर शुभांशू शुक्ला हे तब्बल 18 दिवस अंतराळात यशस्वी प्रवास करून आज पृथ्वीवर परतले आहेत.

स्पेसएक्स आणि नासा यांच्या संयुक्त मिशन अंतर्गत पार पडलेल्या एक्सिओम-4 मोहिमेत शुभांशू यांनी सहभाग घेतला होता. या मोहिमेमध्ये चार देशांच्या अंतराळवीरांनी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर विविध वैज्ञानिक प्रयोग पूर्ण केले. भारताचा प्रतिनिधी म्हणून गेलेल्या शुभांशू यांनी आयएसएसवर भारतीय ध्वज प्रथमच फडकवला आणि देशाचे नाव अंतराळातही उज्ज्वल केले.

या मोहिमेचे महत्त्व केवळ त्यात भारताचा सहभाग असल्यामुळेच नव्हे, तर या मोहिमेमुळे भविष्यातील भारतीय अंतराळ कार्यक्रमाला चालना मिळणार असल्यामुळे देखील अधिक आहे. 1984 मध्ये राकेश शर्मा यांनी अंतराळात पाऊल ठेवले होते, त्यानंतर तब्बल 41 वर्षांनी शुभांशू हे भारताचे दुसरे अंतराळवीर ठरले आहेत.

शुभांशू शुक्ला यांचे योगदान केवळ मोहिमेपुरते मर्यादित नाही. अंतराळातील 18 दिवसांत त्यांनी विविध वैज्ञानिक प्रयोगांमध्ये भाग घेतला. एकूण 60 हून अधिक प्रयोगांमध्ये त्यांनी सहभाग नोंदवला असून, त्यात भारतातील सात महत्वाच्या प्रयोगांचाही समावेश आहे. विशेष म्हणजे, त्यांनी अंतराळात मेथी आणि मूगासारख्या भारतीय पिकांचीही लागवड केली होती. त्यांच्या अंतराळातील शेती प्रयोगांचे फोटो नुकतेच प्रसिद्ध झाले होते आणि त्यांनी संशोधनाच्या नव्या वाटा खुल्या केल्या आहेत.

ही मोहीम भारतासाठी आणखी एका दृष्टीने महत्वाची आहे; कारण गगनयान मोहिमेसाठी याचा उपयोग होणार आहे. इस्रोने या मोहिमेसाठी सुमारे 550 कोटी रुपयांचा खर्च केला असून, या अनुभवातून भारतीय मानवी अंतराळ यान प्रक्षेपणासाठी महत्त्वपूर्ण माहिती मिळणार आहे.

पृथ्वीवर परतल्यानंतर अंतराळवीरांना गुरुत्वाकर्षणाशी जुळवून घेण्यासाठी सात दिवसांच्या विशेष पुनर्वसन प्रक्रियेतून जावे लागते. वजनविरहित अवस्थेतील दीर्घ काळाचा परिणाम शरीरावर होतो आणि त्यामुळे ही प्रकिया वैज्ञानिकांच्या देखरेखीखाली पार पडते.

भारतीय अंतराळ कार्यक्रमासाठी शुभांशू शुक्ला यांचा हा अनुभव अत्यंत मोलाचा ठरणार आहे. त्यांच्या यशामुळे भारताची अंतराळातील उपस्थिती अधिक बळकट झाली आहे आणि भविष्यातील अनेक अंतराळ मोहिमांना नव्या दिशा मिळणार आहेत. 140 कोटी भारतीयांचा अभिमान ठरलेले हे मिशन, देशाच्या स्वप्नांना नवसंजीवनी देणारे ठरले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!