महाराष्ट्रमुंबई

मृणाल गोरे यांची ‘पाणीवाली बाई’ राष्ट्रीय पातळीवर

मुंबई : मृणाल गोरे यांच्या स्मृतिदिनी, 17 जुलैला तिकडे दूर आसामात, गौहत्ती येथे त्यांच्या संघर्षमय जीवनाची कहाणी रंगमंचावर हिंदी भाषेत सादर होत आहे. त्याचे लेखन केले आहे मुंबईच्या निवृत्त प्राध्यापक वसुधा सहस्त्रबुद्धे यांनी आणि सादरकर्त्या आहेत कन्नड भाषिक भागीरथी कदम. त्या राष्ट्रीय पातळीवर मानसन्मान मिळवलेल्या अभिनेत्री- दिग्दर्शक आहेत. सध्या त्या गौहत्तीमधील नाट्य विद्यालयाच्या प्राचार्य म्हणून जबाबदारी निभावतात. त्यांच्या कमलादेवी चट्टोपाध्याय यांच्या जीवनावरील नाट्यप्रयोग भारतात विविध ठिकाणी होत आहे. मृणाल गोरे यांची जीवनकथा त्याच प्रकारे भारतभर सादर होण्याची शक्यता आहे.

वसुधा सहस्त्रबुद्धे मुंबईच्या सिद्धार्थ कॉलेजात हिंदीच्या प्राध्यापक होत्या. त्यांनी हिंदी नाट्य विषयांतच पीएचडी मिळवली आहे. त्यांचा माहिती संशोधन मोहिमेत भागीरथी यांच्याशी संबंध आला व त्यामधून मृणाल गोरे यांच्या जीवनकथेवरील हा कार्यक्रम फुलून आला. सहस्त्रबुद्धे म्हणाल्या, की या मराठी ‘पाणीवाल्या बाई’चा कार्यक्रम राष्ट्रीय पातळीवर जात आहे याचे मला अप्रूप वाटले. कारण आमच्या पिढीसाठी मृणाल गोरे हे प्रेरणास्थान होते. त्यांची आंदोलने सर्वसामान्य माणसांच्या जीवनाशी निगडित होती. त्यांनी विरोधी पक्षाच्या आमदार-खासदार म्हणून वेगवेगळी पदे भूषवली तरी सर्वसामान्य कामवाल्या स्त्रीला त्या महिला शक्तीचे प्रतीक वाटत. पाणीवाली बाई म्हणून त्यांनी केलेली आंदोलने देशभर सर्वत्र स्त्रियांना त्यांची वाटत. त्यामुळे त्यांच्या संघर्षाची कहाणी देशभर प्रसृत व्हावी असे वाटे. भागीरथी कदम यांच्यामुळे माझी ती मनीषा पूर्ण होत आहे.

भागीरथी कदम कन्नड, हिंदी, आसामी, इंग्रजी अशा चार भाषांत नाट्यप्रयोग करत असतात. त्यांना भारतीय आणि आसामी व कर्नाटक पातळीवर बरेच पुरस्कार मिळाले आहेत. त्यांनी शकुंतला, गांधारी आणि मल्लिका यांचे एकपात्री कार्यक्रम केले आहेत. त्यांचे कुटुंब तीन-चारशे वर्षांपूर्वी युद्धमोहिमांच्या ओघात कर्नाटकात गेले, ते तेथेच म्हैसूर जिल्ह्यात स्थिरावले. भागीरथी यांनी कर्नाटकचे ‘निनासम’ या कन्नड नाट्यसंस्थेमध्ये व दिल्लीचे ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’ येथे नाट्य शिक्षण घेतले. त्यांचा विवाह राष्ट्रीय पातळीवरील प्रख्यात अभिनेते दिग्दर्शक बहारूल इस्लाम यांच्याशी झाला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!