दिव्यांगांच्या प्रश्नावरून आमदार प्रविण दरेकर आक्रमक; दिव्यांग आयुक्तांच्या निलंबनाची केली मागणी
तात्काळ निलंबनाचे सभापती राम शिंदेंचे निर्देश

मुंबई – आज विधानपरिषद सभागृहात सदस्य संदीप जोशी यांनी नागपूरच्या गुलशननगर येथील दि मातोश्री शोभाताई भाकरे मतिमंद शाळेबाबत लक्षवेधी उपस्थित केली. या शाळेमध्ये एकूण २६ कर्मचारी कार्यरत असून ते शाळेवरच अवलंबून आहेत. मात्र संस्थेने काढलेले कर्ज फेडावे यासाठी संस्था चालकांकडून कर्मचाऱ्यांकडे वारंवार मागणी केली जात असून संस्थेचे अध्यक्ष कर्मचाऱ्यांकडे दरमहा एक हजार रुपयांची मागणी करतात. तसेच संस्था चालकांनी शिक्षक व कर्मचाऱ्यांना स्वतःची बंदूक काढून धमकवल्याची कर्मचाऱ्यांची तक्रार सभागृहाच्या निदर्शनास आणून देत शाळेवर प्रशासक नेमण्याची विनंती केली. त्याचबरोबर दिव्यांग आयुक्त प्रविण पुरी यांनाही शिक्षक व कर्मचारी संस्था चालकांच्या अघोरी धोरणामुळे आत्महत्या करतील यासाठी लक्ष द्यावे अशी विनंती केली. मात्र त्यांनी लक्ष दिले नाही. त्यांच्यावर शासन कारवाई करणार का? असा सवाल केला.
माननीय मंत्री अतुल सावे यांच्या उत्तराने समाधान न झाल्यामुळे भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर आक्रमक झाले. आमदार संदीप जोशी यांनी ६ वेळा फोन केला तेव्हा दिव्यांग आयुक्तांनी फोन घेतला. जोशी आमदार नसते तर फोन घेतलाही नसता. आमदारांची ही अवहेलना होणार असेल तर इतरांचे काय ? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिव्यांगांच्या बाबतीत संवेदनशील आहेत. त्यांनी दिव्यांगांचा स्वतंत्र विभाग सुरु केला आहे. त्यामुळे अवहेलना करणाऱ्या या दिव्यांग आयुक्तांचे निलंबन करा ही सभागृहाची मानसिकता आहे, अशी मागणी त्यांनी केली.
यावर सभापती राम शिंदे यांनी सदनाच्या दोन्ही बाजूच्या भावना तीव्र असून दिव्यांग आयुक्तांना आजच्या आज तातडीने सक्तीच्या रजेवर पाठवून सरकारच्या माध्यमातून निलंबित करण्याची कारवाई करावी, असे निर्देश दिले. त्यावर मंत्री सावे यांनी सभापती यांनी म्हटल्याप्रमाणे कारवाई केली जाईल असे उत्तर दिले.