६३ हजार ७०७ एसटी कर्मचाऱ्यांना सोडावे लागणार नव्या वेतनावर पाणी;कारण..

मुंबई :- दिवाळीपासून संपावर गेलेले एसटी कर्मचारी अद्यापही संपावर ठाम आहेत.हा संप मिटावा यासाठी राज्य सरकारने कामगारांच्या प्रमुख मागण्या मान्य करत पगारवाढही केली.संपकऱ्या कामगारांवरील निलंबनाची कारवाई देखील राज्य सरकारने मागे घेतली. मात्र, तरीही विलीनीकरणाच्या मुद्द्यावर ठाम असलेले एसटी कर्मचारी काही केल्या संप मागे घेण्याचे नाव घेत नाहीत.
अश्यातच गेल्या दोन महिन्यांपासून कामावर हजर राहिलेल्या कामगारांना नवीन वेतन नियमानुसार वेतन देण्यात येत आहे. मात्र, निलंबित, बडतर्फ, सेवासमाप्ती केलेले कर्मचारी, संपावर ठाम राहिलेले आणि गैरहजर कर्मचारी यांना सलग दुसऱ्यांदा वेतनाला मुकावे लागणार आहे.
आज, शुक्रवारी ७ जानेवारीला एसटी कर्मचाऱ्यांच्या खात्यावर नवे वेतन जमा होणार आहे. मात्र, हे वेतन उपस्थित एसटी कर्मचाऱ्यांनाच मिळणार असून संपात सामील असलेल्या कर्मचाऱ्यांना सलग दुसऱ्यांदा या वेतनाला मुकावे लागणार आहे. एकूण ८८ हजार ३४७ कर्मचाऱ्यांपैकी निलंबित, बडतर्फ, सेवासमाप्ती केलेले कर्मचारी आणि संपात सध्या सामील असलेल्या ६३ हजार ७०७ कर्मचाऱ्यांना नव्या वेतनावर पाणी सोडावे लागणार आहे.
दोन महिन्यांत काही कर्मचारी निवृत्त झाल्याने सध्या एसटीतील एकूण कर्मचारी संख्या ८८ हजार ३४७ झाली आहे. यात २४ हजार ६४० कर्मचारी कर्तव्यावर हजर झाले आहेत. तर ६३ हजार ७०७ कर्मचारी कामावर हजर न झाल्याने त्यांना वेतन देण्यात आलेले नाही. निलंबित कर्मचारी ११ हजार २४ असून बडतर्फ केलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या १ हजार ५१३ आहे. तर बडतर्फीची कारणे दाखवा नोटीस बजावलेले कर्मचारीही ३,५९३ आहेत. याशिवाय रोजंदारीवरील सेवासमाप्ती केलेल्या कर्मचाऱ्यांचीही संख्या सुमारे दोन हजार इतकी आहे.