विधिमंडळाची परंपरा अध्यक्षांनी धुळीस मिळवली – आमदार भास्कर जाधव यांचा हल्लाबोल

मुंबई : विधानसभेत बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विविध मुद्द्यांवरून शिवसेना ( ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता. एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेला आमदार भास्कर जाधव हे उत्तर देण्याचा प्रयत्न करत होते. पण, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी भास्कर जाधव यांना बोलू दिले नाही आणि सभागृह तहकूब करण्यात आलं होतं. यानंतर विधिमंडळाबाहेर येऊन भास्कर जाधव यांनी एकनाथ शिंदे आणि राहुल नार्वेकर यांच्यावर संताप व्यक्त केला आहे.
भास्कर जाधव म्हणाले, एकनाथ शिंदे हे उत्तर देत होते. आम्ही एकही शब्द बोललो नाही. खरेतर एकनाथ शिंदे यांच २९३ च्या प्रस्तावाचं भाषण नव्हतं. महाराष्ट्राच्या बाहेर परभणी, ठाणे, शिक्षण, बांधकाम, पाणी योजनांचा विषयावर एकनाथ शिंदे बोलले नाहीत. फक्त एकनाथ शिंदे खोटे बोलले आहेत. आम्ही उत्तर देण्याचा अधिकार आहे. मला अध्यक्षांनी संधी दिली नाही. अध्यक्ष स्वत:ला सरकार समजतात. आम्ही सरकारला प्रश्न विचारतो. हे अध्यक्ष केवळ केवळ सरकार म्हणून वावरतात.
“आपण सरकारला कसे वाटचतोय, हे दाखवून अध्यक्ष धन्यता मिळवतात. माझ्यावर कुणी हक्कभंग आणला तरी हरकत नाही. महाराष्ट्राच्या विधिमंडळाची परंपरा अध्यक्षांनी धुळीस मिळवली आहे. या विधिमंडळाला लक्षवेधी मंडळ नाव द्या.” असा हल्लाबोल भास्कर जाधव यांनी केला.