भक्ती असेल तर वारीचा नेम चुकायचा नाही- ह.भ.प. कदम बुआ

मुंबई : पायीवारीचे यंदाचे माझे 23 वे वर्ष… मलकापूर जिल्हा कोल्हापूर ते पंढरपूर हे सुमारे २५० किलोमीटर अंतर कापायचे होते.
वडिलांचे आजारपण डोळ्यापुढे होते. वडिलांचा शेवट जवळ आलेला दिसत होता. कधीही बोलावणे येईल अशी परिस्थिती होती. माझ्या मनाची तगमग होऊ लागली…काय करावे ? वडिलांसोबत राहावे तर वारीचा २३ वर्षांचा नेम चुकणार होता. वारीला निघालो आणि इथे काही घडले तर वडिलांचे अत्यंदर्शन देखील होणार नाही असा विचार मनात येत होता. अखेर सर्व काही पांडुरंगावर सोडून मनाचा हिय्या करून वारीत सामील झालो…रस्त्यामध्ये उभा विठ्ठलाची मूर्ती दिसली. तिथेच त्याच्या पायाला हात लावून विठ्ठलाला सांगितले की बाबांना बरे वाटू दे पण नियतीला ते मान्य नव्हते. वारीतील शेवटचा मुक्काम संपल्यानंतर पंढरपूर अवघ्या पाच किमी अंतरावर असताना दिनांक 05 जुलै 2025 दशमी सकाळी 8.00 वाजता गावावरून फोन आला भाऊ पहाटे झोपेतच गेले तू पाठीमागे ये आता… शेवटी
माझ्या भाऊंसाठी माझ्या वडिलांसाठी मागे फिरलो आणि शेवटचे अंत्य दर्शन केले अंत्यविधी केला.
माझ्या बाबांना विठ्ठलाने बोलवून घेतलं आणि रस्त्यात मूर्ती रूपाने भेटून माझी त्या पांडुरंगाला भेटण्याची ईच्छा देखील पूर्ण झाली. आता तुम्हीच सांगा पंढरीची वारी चुकली कशी म्हणावी…?
ह.भ.प. अनिल कदम बुआ हे विधानमंडळ सचिवालय येथे सहाय्यक कक्ष अधिकारी या पदावर कार्यरत आहेत.