१७ खासदारांना ‘संसदरत्न’ गौरव; राज्यातील सात जणांचा सन्मान !

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार) खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह देशभरातील १७ खासदार आणि दोन संसदीय स्थायी समित्यांची यंदाच्या संसदरत्न पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. राज्यातील सात खासदारांना हा सन्मान मिळणार आहे. प्राइम पॉइंट फाउंडेशनने स्थापित केलेले हे पुरस्कार संसदेत योगदान देणाऱ्या खासदारांना दिले जातात. राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे (एनसीबीसी) अध्यक्ष हंसराज अहिर यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने पुरस्कार विजेत्यांची निवड केली. भाजप खासदार भर्तृहरी महताब, राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे, शिवसेना- शिंदे गटाचे श्रीरंग बारणे आणि क्रांतिकारी समाजवादी पक्षाचे एन. के. प्रेमचंद्रन यांना ‘संसदीय लोकशाहीत उल्लेखनीय आणि सातत्यपूर्ण योगदान’ यासाठी पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.हे चार खासदार १६ व्या आणि १७ व्या लोकसभेत सर्वोच्च कामगिरी बजावत होते आणि त्यांच्या सध्याच्या कार्यकाळातही ते असेच करत राहतील, असे ‘प्राइम पॉइंट फाउंडेशन’च्या निवेदनात म्हटले आहे. संसदेत सादर केलेल्या अहवालांच्या आधारे अपवादात्मक कामगिरीसाठी वित्त आणि कृषी या दोन विभागीय स्थायी समित्यांचीही पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. वित्तविषयक स्थायी समितीच्या अध्यक्षपदी महताब तर कृषी स्थायी समितीच्या अध्यक्षपदी काँग्रेसचे चरणजीत सिंग चन्नी आहेत.
पुरस्कार विजेते..
• सुप्रिया सुळे (राष्ट्रवादी शरद पवार गट) • वर्षा गायकवाड (काँग्रेस)• अरविंद सावंत (शिवसेना उद्धव ठाकरे गट) • नरेश म्हस्के (शिवसेना शिंदे गट) • श्रीरंग बारणे (शिवसेना शिंदे गट) • स्मिता वाघ (भाजप) • मेधा कुलकर्णी (भाजप) • भर्तृहरी महताब (भाजप) • प्रवीण पटेल (भाजप) • रवी किशन (भाजप) • निशिकांत दुबे (भाजप) • विद्यात बरन महातो (भाजप) • पी. पी. चौधरी (भाजप) • मदन राठोड (भाजप) • सी. एन. अण्णादुराई ( द्रमुक) • दिलीप सैकिया (भाजप) • एन. के. प्रेमचंद्रन (आरएसपी)






