२०० वर्षांपूर्वीचे शिवमंदिर तोडल्याने भक्तांमध्ये संतापाची लाट

मुंबई / रमेश औताडे : मुरबाड तालुक्यातील प्रसिद्ध असलेल्या काळू डोईफोडी या दोन नदयांच्या संगमावर वसलेले दोनशे वर्षांपूर्वीचे शिवमंदिर तोडल्याने भक्तांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर संतप्त शिवभक्तांनी उपोषण सुरू केले आहे.
पर्यटन क्षेत्राच्या विकासासाठी काम सुरु केल्याचे सांगुन हि कारवाई केली आहे. कार्यकारी अभियंता, पुरातन विभाग इतर संबंधित अधिकारी यांनी या प्रकरणी गांभीर्याने लक्ष दिले नाही. पुरातत्व विभागाची मंदिर तोडण्याची परवानगी होती का ? असा सवाल शिवभक्त करत आहेत. उपविभागीय अभियंता यांनी या प्रकरणी काय कार्यवाही केली ? त्यांची काय जबाबदारी होती ? असे अनेक सवाल शिवभक्त करत आहेत.
या प्रकरणी न्याय मिळावा यासाठी तहसीलदार कार्यालयासमोर शरद पाटील, गजानन ठाकरे, अशोक जाधव, संजय मोरे, विजय पवार यांच्यासह इतर शिवभक्तांनी तहसीलदार कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई न झाल्यास उपोषण सुरूच ठेवण्याचा इशारा शिवभक्तांनी दिला आहे.