
मुंबई – राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाले असताना दुसरीकडे मात्र मनसे आणि भारतीय जनता पक्षाच्या आघाडीची जोरदार चर्चा होताना दिसून येत आहे. अशातच आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय तथा भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुंबईत ‘शिवतीर्थ’ या त्यांच्या नव्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी लाड यांच्या पत्नी देखील उपस्थित होत्या.
ही भेट राजकीय नसून आमदार प्रसाद लाड हे त्यांच्या मुलीच्या लग्नाची निमंत्रण पत्रिका घेऊन ‘शिवतीर्थ’वर आले होते. यावेळी राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी लाड दाम्पत्याचं आदरातिथ्य केलं आणि दोघांनाही शुभेच्छा दिल्या. तसंच दोघांनाही सोडण्यासाठी त्या अगदी शिवतीर्थच्या गेटपर्यंत आल्या होत्या. शर्मिला ठाकरे आणि लाड यांच्या पत्नीमध्ये बराच वेळ गप्पा देखील रंगलेल्या पाहायला मिळाल्या. यावेळी राज ठाकरे यांचं दर्शन मात्र घडलं नाही.
प्रसाद लाड आणि राज ठाकरे यांचे खूप आधीपासूनच चांगले संबंध आहेत. याआधीही अनेकदा प्रसाद लाड राज ठाकरेंच्या भेटीसाठी कृष्णकुंजवर आल्याचं पाहिलं आहे. त्याच पद्धतीनं आजची भेट देखील राजकीय नसून केवळ कौटुंबिक भेट होती. यावेळी कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याची माहिती समोर आली आहे. मात्र दुसरीकडे या भेटीमुळे पुन्हा एकदा मनसे आणि भाजपा युतीच्या चर्चेला उधाण आले आहे.