आदित्य ठाकरे यांना विरोधी पक्षनेतेपद दिल्यास मी तत्काळ माझे नाव मागे घेईन- आ. भास्कर जाधव …

नागपूर : विरोधी पक्षनेतेपदाच्या मुद्द्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी महाविकास आघाडीकडून आपले नाव निश्चित असूनही, सरकारने अद्याप कोणताही निर्णय न घेतल्याबद्दल नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशना दरम्यान तीव्र टीका केली आहे.
जाधव यांनी थेट सरकारवर हल्ला चढवताना म्हटले आहे की, विरोधी पक्षनेत्याची निवड झाल्यास सत्ताधारी पक्षातील लोक एकमेकांना अडचणीत आणतील, या भीतीने सरकार जाणीवपूर्वक निर्णय घेत नाहीये. महाविकास आघाडीकडून विधानसभा विरोधी पक्षनेतेपदासाठी भास्कर जाधव यांच्या नावाचे पत्र देण्यात आल्याचे आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.
मात्र, भास्कर जाधव यांनी एक महत्त्वपूर्ण विधान केले आहे. जर सरकारने आदित्य ठाकरे यांना विरोधी पक्षनेतेपदासाठी मान्यता दिली तर मी तत्काळ माझा दावा रद्द करीन, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, विरोधी पक्षनेतेपदासाठी दहा आमदार असलेल्या पक्षाला संधी मिळणे शक्य आहे, असे माझे मत आहे. पण, सध्या विधानमंडळ सचिवालयाकडून एकूण सदस्यसंख्येच्या 10 टक्के सदस्यांची अट आहे. यासंबंधी कायद्यातील तरतुदींची माहिती देण्यासाठी मी सचिवालयाला पत्र लिहिले आहे, असेही त्यांनी सांगितले.
सध्या सरकारमधील भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर येत असून, विरोधी पक्षनेत्याची घोषणा झाल्यास सत्ताधारी पक्षातील लोक एकमेकांना अडचणीत आणण्यासाठी माहितीचा उपयोग करतील, अशी भीती सरकारला आहे, असे भाष्य करून जाधव यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.






