मुंबईमहाराष्ट्र

महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेसाठी 31 ऑगस्ट पर्यंत ऑनलाईन प्रवेशिका उपलब्ध

मुंबई : शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने 3 नोव्हेंबर, 2025 पासून सुरु होणाऱ्या हौशी मराठी, हिंदी, संगीत व संस्कृत राज्य नाट्य स्पर्धांसाठी तसेच बालनाट्य स्पर्धा व दिव्यांग बालनाट्य स्पर्धांसाठी नाट्य संस्थांकडून 1 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट, 2025 पर्यंत ऑनलाईन पध्दतीने प्रवेशिका मागविण्यात येत असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य संचालक विभीषण चवरे यांनी दिली. सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार व सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य नाट्य स्पर्धा पार पडणार असल्याचे चवरे यांनी नमूद केले आहे.

22 व्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी डिसेंबर, 2025 पासून विविध 10 केंद्रांवर तर 64 व्या हौशी हिंदी, संगीत व संस्कृत नाट्य स्पर्धेची अंतिमफेरी प्रत्येकी एका केंद्रावर डिसेंबर, 2025 पासून आयोजित करण्यात येणार आहे.

नोंदणीकृत हौशी नाट्य संस्थांना तसेच गतवर्षी राज्यनाट्य स्पर्धेत सहभागी झालेल्या नाट्य संस्थांना स्पर्धेसाठी विहित नमुन्यातील प्रवेशिका, नियम संचालनालयाच्या https://mahanatyaspardha.com या वेबसाईटवर ऑनलाईन उपलब्ध होतील. आवश्यक त्या कागदपत्रासह प्रवेशिका 31 ऑगस्ट, 2025 पर्यंत ऑनलाईन सादर कराव्यात.

विहित मुदतीनंतर कोणत्याही परिस्थितीत प्रवेशिका स्विकारल्या जाणार नाहीत. प्रवेशिकेसोबत आवश्यक असणारी कागदपत्रे जोडलेली नसल्यास किंवा संपूर्ण तपशिल भरला नसल्यास ऑनलाईन प्रवेशिका भरता येणार नाही.

स्पर्धेसाठी संस्थेची निवड झाल्यानंतर संस्थेने शासनाने निश्चित केलेल्या केंद्रावर व दिलेल्या तारखेस प्रयोग सादर केला नाही, तर त्यांची प्रवेशिकेसोबत भरलेली अनामत रक्कम शासकीय कोषागारात जमा करण्यात येईल. नाट्यस्पर्धेकरीता संस्थांना शासन नियम बंधनकारक राहतील. नियमांचे उल्लंघन केल्यास संस्थेला अपात्र ठरविण्यात येईल.

राज्यातील जास्तीत जास्त नाट्य संस्थांनी महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेत आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन चवरे यांनी केले आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!