महाराष्ट्रातील लेडीज बार बंद व्हावेत – रामदास कदम

मुंबई : मनसेच्या बारविरोधी भूमिकेला आमचा संपूर्ण पाठिंबा असल्याचे शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी म्हटले आहे. गृहमंत्री योगेश कदम यांच्या केवळ बदनामीचा हेतू ठेवूनच अनिल परब हे काम करीत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. सावली बार प्रकरणावरून निर्माण झालेल्या वादात आता रामदास कदम यांनी आक्रमक भूमिका घेत थेट अनिल परब यांना प्रत्युत्तर दिलं आहे. सावली बारच्या बाबतीत अनिल परब हेतुपुरस्सर बदनामी करत आहेत, असं म्हणत त्यांनी परब यांच्यावर जोरदार टीका केली. तू राजीनामा मागणारा कोण? असा सवालही त्यांनी परब यांना थेट विचारला. कदम यांनी सावली हॉटेलच्या भाडे कराराचा दाखला देत स्पष्ट केले की, शरद शेट्टींना हॉटेल चालविण्यासाठी दिलं होतं आणि त्यामध्ये कोणताही बेकायदेशीर धंदा न करण्याची अट नमूद आहे. कदम पुढे म्हणाले की, अटींचा भंग झाल्याने आम्ही त्याला बाहेर काढलं आणि दोन्ही लायसन्स १३ तारखेला तत्काळ जमा केले. अनिल परब यांनी मात्र १८ तारखेला विधिमंडळात मुद्दा उपस्थित केला. हे दिशाभूल करणारे असून, राजीनाम्याचा प्रश्नच उदभवत नाही. मनसेच्या बारविरोधी आंदोनावर त्यांनी खूप खूप अभिनंदन व्यक्त करत म्हटलं की, महाराष्ट्रात जिथे लेडीज बार असतील ते सर्व बंद झाले पाहिजेत. पोलिसांच्या भूमिकेबाबतही त्यांनी नाराजी व्यक्त केली. काही पोलिसांनी योगेश कदम यांना थांबवण्यासाठी फोन केल्याचा उल्लेख करत हे एक हेतुपुरस्सर कारस्थान असल्याचा आरोप केला. अनिल परब यांना इशारा देताना कदम म्हणाले, सर्व पत्ते उघड करणार नाही, पण कायदेशीर कारवाई करणार. भविष्यात उत्तर मिळेल. दरम्यान जितेंद्र आव्हाड यांच्यावर उपहासात्मक टीका करत त्यांनी धर्मगुरू व्हायला हवं असंही कदम म्हणाले, तर संजय शिरसाट यांना शाब्दिक भूमिका बदलण्याचा सल्ला दिला.