पुण्यावरून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या पर्यटकाला दोरीने बांधून मारहाण – कुडाळमध्ये खळबळ

पुण्यावरून गोव्याच्या दिशेने प्रवास करणाऱ्या एका पर्यटकाला स्थानिक हॉटेल व्यावसायिकाने दोरीने बांधून बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना कुडाळ येथे घडली. याप्रकरणी सहा जणांविरुद्ध कुडाळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला असल्याची माहिती कुडाळचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी पत्रकारांना दिली. पुणे कात्रज येथील पर्यटक गोव्याला जात होते गुरुवारी सकाळी सहाच्या सुमारास मुंबई गोवा महामार्गावर झाराप झिरो पॉईंट येथे एका हॉटेलमध्ये चहा पिण्यासाठी हे पर्यटक थांबले. चहा घेताना एका कपात माशी पडली त्यामुळे त्यांनीही चहा बदलून द्या असे सांगितले त्यावरून हॉटेल व्यावसायिक आणि त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली त्याचे पर्यावसान मारहाणीत झाले.
हॉटेल व्यवसायिकासह अन्य काही जणांनी या पर्यटकाचे हातपाय बांधून त्याला उताणी रस्त्यावर झोपवले आणि मारहाण केली. सकाळी हा प्रकार घडला. मुंबई गोवा महामार्गावर वाहनांची रहदारी होती महामार्गावरून प्रवास करणाऱ्या एका ने ११२ नंबर ला कॉल केला आणि या घटनेची पोलिसांना माहिती दिली, त्यानंतर पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्या नेतृत्वाखाली कुडाळ पोलीस ठाण्याची टीम घटनास्थळी तात्काळ दाखल झाली आणि त्या पर्यटकांची सोडवणूक केली असल्याचेमगदूम यांनी सांगितले. त्यानंतर पोलिसांच्या वतीने या घटने विरोधात तक्रार देण्यात आली आणि मारहाण करणाऱ्या व त्यांना सहाय्य करणाऱ्या सहा जणांविरुद्ध कुडाळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला असल्याचे सांगितले.