पोलादपूर मार्गे-महाबळेश्वर आणि वाई मार्गे पाचगणी-महाबळेश्वर रोपवे प्रकल्प सुरु करा – खासदार रविंद्र वायकर

मुंबई : महाराष्ट्रातील नंदनवन अशी ओळख असलेल्या महाबळेश्वर येथे पर्यटकांची होणारी गर्दी त्यामुळे होणारे वाहतूक कोंडी, याचा पर्यावरणावर होणारा परिणाम रोखण्यासाठी महाबळेश्वर येथे पोलादपूर मार्गे महाबळेश्वर आणि वाई मार्गे पाचगणी महाबळेश्वर अशी रोपवे सेवा सुरु करण्यात यावी, अशी मागणी २७ मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्राचे खासदार रविंद्र वायकर यांनी निवेदनाद्वारे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
महाबळेश्वर हे राज्यात नाही तर भारतातील एक अग्रगण्य थंड हवेचे ठिकाण व प्रेक्षणीय पर्यटन स्थळ असून दरवर्षी भारतातून लाखो पर्यटक येथे भेट देतात. भारत देशाच्या एकूण स्ट्रोबेरी उत्पनांपैकी ८५ टक्के स्ट्रोबेरी उत्पादन येथे होते. परंतु येथील पर्यटन क्षेत्रातील वाढती वाहनांची संख्या, प्रदूषण, वाहतूककोंडी आणि नैसर्गिक परिसंस्थेवर होणारे परिणाम हि गंभीर समस्या बनली आहे. हे सर्व लक्षात घेता, या भागासाठी पर्यावरण पूरक आणि दीर्घकालीन उपाययोजना आवश्यक असल्याचे खासदार वायकर यांनी निवेदनात नमूद केले आहे.
महाबळेश्वरला जोडणारा प्रमुख मार्ग म्हणजे आबेनळी घाट, मेढा घाट. हे सर्व घाटमार्ग अरुंद असून ,तीव्र वळणाचे आहेत, वाढत्या पर्यटक संख्येमुळे या मार्गावर विशेषता सुट्ट्यांमुळे आणि पर्यटक हंगामात प्रचंड वाहतूक कोंडी होते. यामुळे प्रवासाचा वेळ वाढतो तसेच इंधन वाया जाते. वाहनाच्या धुरामुळे येथील प्रदूषणात वाद होत आहे. या घाटांमधून प्रवास करणे पर्यटकांसाठी अनेकदा गैरसोयीचे तसेच धोकादायक ठरते. यातून मार्गे काढण्यासाठी तसेच महाबलेश्वर्च्या घात्रास्त्यावरील वाहतूक भार कमी करण्यासाठी आणि सुरक्षित, स्वच्छ व सुलभ प्रवासासाठी पोलादपूर मार्गे ते महाबळेश्वर आणि वाई मार्गे पाचगणी महाबळेश्वर दरम्यान रोपवे प्रकल्प उभारण्यात यावा अशी मागणी खासदार वायकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
यामुळे वाहतूककोंडी कमी होण्यास मदत होणार असून आंबेनळी, मेढा,पसरणी घात मार्गावरील वाहनाचा ताण कामी होणार, इंधन व ध्वनि प्रदूषणात घट होऊन परिसरातील पर्यावरणाची हानी कमी होणार, वन्यजीव आणि जंगल परीसंस्थेचे रक्षण होईल, पर्यटकांना आकर्षक आणि नैसर्गिक सौदर्याचा अनुभव मिळेल, स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, स्थानिक गावांना रोजगार, व्यवसाय आह्मो सुविधा निर्माण होतील, रोपवे सुरु होणाऱ्या दोन्ही ठिकाणी अत्याधुनिक सोयी सुविधांनी युक्त आणि पर्यावरणपूरक भव्य वाहनतळाची सुविधा असावी, हवामान बदलाचा विचार करून पुढील ५० वर्षाचे अंदाज लक्षात घेऊन सविस्तर अभ्यास व्हावा. तापमान, पर्जन्यमान, धुके, वारे यांचा सखोल अभ्यास करूनच प्रकल्प रचना केली जावी, अशा सूचनाही खासदार वायकर यांनी निवेदनात केल्या आहे.