प्लॅस्टिकच्या बाटलीतून पाणी पिताय? आरोग्यावर असा होतो परिणाम!

प्रवासादरम्यान आपण कायम सोबत प्लॅस्टिकची पाण्याची बाटली ठेवतो वा विकत घेतो.रस्त्यात मध्येच तहान लागल्यास, ही बाटली कामी येते.मात्र या प्लॅस्टिकच्या बाटलीतून पाणी पिणे, आरोग्यासाठी चांगले की वाईट, याचा कधीही फारसा विचार केला जात नाही.चला तर मग याबाबत सविस्तर जाणून घेऊ या.
आरोग्यासाठी चांगले की वाईट?
प्लॅस्टिकमध्ये ‘बिसफेनोल-ए’ (BPA) हे एक घातक रसायन असते. ते पाण्यासोबत शरीरात गेल्यास हानीकारक ठरू शकते.या प्लॅस्टिकच्या बाटलीऐवजी काचेची बाटली वापरावी. काचेच्या बाटलीत कितीही दिवस पाणी चांगले राहते, मात्र प्लॅस्टिकच्या बाटलीत जास्त दिवस पाणी ठेवल्यास त्याची चव बदलते.
पाण्याची प्लॅस्टिकची बाटली बराच काळ उन्हात राहिल्यास, सूर्यकिरणांमुळे प्लॅस्टिकमधील ‘बीपीए’ रसायन पाण्यात तातडीने मिसळलं जातं. ते आरोग्यासाठी हानीकारक ठरु शकते. त्यामुळे पाण्याची प्लॅस्टिक बाटली सावलीत ठेवा.लिंबू-पाणी ठेवण्यासाठी काचेच्या बाटलीचाच पर्याय चांगला आहे. प्लॅस्टिक बाटलीतील रसायनामुळे लिंबू-पाण्याचा स्वाद बिघडतो.
प्लॅस्टिकची पाण्याची बाटली सातत्याने न धुतल्यास त्यात जीवाणू तयार होऊ शकतात. प्लॅस्टिकपेक्षा काचेची बाटली स्वच्छ करणे सोपे जाते.लहान बाळांनाही काचेच्या बाटलीतून दूध पाजणे फायदेशीर ठरते.