उमेश सकपाळ व पालकमंत्री उदय सामंतांच्या तातडीच्या प्रयत्नांनी चिपळूण शहरातील पाणीपुरवठा लवकर पूर्ववत

मुंबई : गेल्या चार दिवसांपासून चिपळूण शहरात नगर पालिकेच्या पाणीपुरवठा योजनेत गंभीर अडचणी निर्माण झाल्या होत्या. कोयना प्रकल्पातून वीज निर्मिती कमी प्रमाणात होत असल्याने वाशिष्ठी नदीत अवजल कमी सोडले जात होते. यामुळे पाणीपुरवठा कमी दाबाने चालू होता आणि शहराच्या काही भागात पाणी लिफ्ट होत नसल्याने नागरिकांना दिवाळीच्या पहिल्या दिवशीही पाणी उपलब्ध नव्हते.
या पार्श्वभूमीवर शहरातील काही नागरिकांनी या समस्येबाबत शिवसेनेचे शहर प्रमुख आणि माजी नगरसेवक उमेश सकपाळ यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी तातडीने पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख रोहित खाडे यांच्याशी चर्चा केली आणि अडचणीची माहिती दिली.
समस्या गंभीर असल्याचे लक्षात आल्यानंतर उमेश सकपाळ यांनी तत्काळ पालकमंत्री उदय सामंत यांच्याशी संपर्क साधला. पालकमंत्र्यांनी वीज निर्मिती संबंधित अधिकाऱ्यांना त्वरित सूचना देऊन वीज निर्मिती प्रकल्पामधील जनरेशन सुरू करण्याचे आदेश दिले. यामुळे वाशिष्ठी नदीत पाणी पुन्हा सोडले जाईल आणि उद्यापासूनच शहरातील पाणीपुरवठा पूर्ववत सुरू होईल, अशी माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली.
नगर पालिकेच्या अधिकाऱ्यांच्या मते, या उपाययोजनेमुळे दिवाळीच्या काळात शहरातील नागरिकांना पाण्याच्या अडचणीचा सामना करावा लागणार नाही. नागरिकांमध्ये ही त्वरित आणि तत्पर उपाययोजना समाधानाची ठरली आहे.
शहरातील पाणीपुरवठ्याचे व्यवस्थापन नियमित करण्यासाठी प्रशासन सतत लक्ष ठेवत आहे आणि नागरिकांना वेळोवेळी सुधारित माहिती देण्याचे आश्वासन दिले आहे.






