“नैसर्गिक शेती हीच भविष्यातील क्रांती “ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राज्यपाल देवव्रत यांच्या उपक्रमाला पाठिंबा भविष्यातील धोका टाळायचा असेल तर नैसर्गिक शेती शिवाय पर्याय नाही – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : “नैसर्गिक शेतीच्या माध्यमातून महाराष्ट्रात मोठी क्रांती घडेल आणि याचा थेट फायदा शेतकऱ्यांना मिळेल. भविष्यातील संभाव्य धोका लक्षात घेऊन आपण सर्वांनी नैसर्गिक शेतीला प्राधान्य देण्याचा संकल्प करूया,” असे आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
राजभवन येथे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या संकल्पनेतून आयोजित केलेल्या नैसर्गिक शेती परिषदेत शिंदे बोलत होते.
या परिषदेला राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, मंत्री चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे, प्रताप सरनाईक, गिरीश महाजन, अशिष शेलार, राधाकृष्ण विखे पाटील, तसेच अनेक मंत्री, मान्यवर, आमदार आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिंदे म्हणाले, “काळाची गरज ओळखून नैसर्गिक शेतीकडे पावले टाकणे गरजेचे आहे. काही भागात आपण सुरुवात केली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही देशभर नैसर्गिक शेतीकडे वळण्याचा संदेश दिला आहे. ही परिषद घेण्याची सूचना देखील मोदीजींनी केली होती.”
राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या प्रयत्नांचे कौतुक करत शिंदे म्हणाले, “नैसर्गिक शेतीची आवड असणारे राज्यपाल महाराष्ट्राला लाभले हे आपले भाग्य आहे. ते स्वतः अनुभवी शेतकरी आहेत आणि रासायनिक शेतीचे दुष्परिणाम लक्षात घेत त्यांनी नैसर्गिक शेतीचा मार्ग स्वीकारला.”
शिंदे यांनी स्पष्ट केले की, नैसर्गिक शेतीमुळे उत्पादन कमी होत नाही, उलट जमिनीची सुपीकता आणि अन्नाची गुणवत्ता वाढते. जनजागृतीमुळे गैरसमज दूर होतील, असा त्यांचा विश्वास आहे.
राज्यपाल देवव्रत लवकरच राज्यभर नैसर्गिक शेतीबाबत दौरे करणार असून त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल, असेही त्यांनी सांगितले.
परिसंवादात उपस्थित तज्ञ आणि प्रयोगशील शेतकऱ्यांच्या ज्ञानाचा उपयोग सर्वसामान्यांना होईल, असा विश्वास शिंदेंनी व्यक्त केला.
हवामानातील बदलांविषयी बोलताना ते म्हणाले, “मे महिन्यात पाऊस पडतो, दिवाळीतही थंडीऐवजी पाऊस दिसतो. ही ग्लोबल वॉर्मिंगची लक्षणे आहेत. त्यामुळे अशा परिषदांची गरज त्यांनी अधोरेखित केली.”
शिंदे म्हणाले, “राजभवनातील ही परिषद मर्यादित न राहता, आमदार-खासदारांनी आपल्या कार्यक्षेत्रात नैसर्गिक शेतीचा प्रचार करावा. माझ्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात २५ लाख हेक्टर क्षेत्रावर नैसर्गिक शेतीला प्राधान्य दिले आहे. महायुती सरकार सेंद्रिय शेतीला चालना देत आहे.”
ते पुढे म्हणाले, “आधुनिक शेतीमुळे रासायनिक खतांचा वापर वाढला, पीक वेगाने येऊ लागले, पण गुणवत्तेत घट झाली. मानवाने निसर्गाला वेठीस धरले आहे आणि भविष्यात त्याचे गंभीर परिणाम होतील. हा धोका टाळायचा असेल तर नैसर्गिक शेती हाच एकमेव पर्याय आहे.”
“मेरे देश की धरती सोना उगले… या गाण्याची आठवण करून देताना त्यांनी सांगितले, आज आपण याच्या विरुद्ध दिशेने चाललो आहोत. त्यामुळे आपल्या हातात दगड गोटे येतील. रासायनिक खतांमुळे कॅन्सरचे प्रमाण वाढले असून प्रत्येक जिल्ह्यात ही भीती वाढते आहे,” अशी चिंता त्यांनी व्यक्त केली.
शिंदे पुढे म्हणाले, “नैसर्गिक शेती करणाऱ्या भागात लोकांचे आयुष्यमान वाढते आणि ते आजारांपासून दूर राहतात. आपल्या पूर्वीच्या पिढ्या नैसर्गिक अन्नामुळे शंभर वर्षे जगत होत्या. आज मात्र स्लो पॉयझन आपल्या शरीरात जात आहे.”
“मी स्वतः शेतकरी आहे. गावाला गेलो की काहींना पोटदुखी सुरू होते,” असे म्हणत त्यांनी विरोधकांना टोला लगावला. “मी अलीकडेच ३,००० स्ट्रॉबेरीची लागवड केली असून मी स्वतः नैसर्गिक शेती करतो,” असेही त्यांनी सांगितले.
“सातारा येथे समूह शेती करण्याचा मानस आहे आणि त्यातून नैसर्गिक शेतीचा संदेश सर्वांपर्यंत पोहोचवू,” असे शिंदे म्हणाले. त्यांनी सांगितले की ९ हजार हेक्टरवर बांबू लागवड केली आहे आणि वेळ अजून गेलेली नाही, आपण शहाणे होण्याची हीच वेळ आहे.
शेवटी त्यांनी सांगितले, “कणेरी मठाचे प्रमुख काडसिद्धेश्वर स्वामी, श्री श्री रविशंकर, नाम फाउंडेशन, धर्माधिकारी प्रतिष्ठान या संस्थांच्या अनुभवाचा लाभ घेऊन आपण नैसर्गिक शेतीला चालना देऊ शकतो. पूरग्रस्त शेतकऱ्यांना पुन्हा उभे करण्यासाठीही आपण प्रयत्न करत आहोत.” असे सांगितले.





