चतुरस्त्र अभिनेता, कला क्षेत्रातील मार्गदर्शक दुवा हरपला;मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ अभिनेते सतीश शाह यांना श्रद्धांजली*

मुंबई: चतुरस्त्र अभिनेते म्हणून सतीश शाह यांनी सिने, नाट्यसृष्टीत आपला वेगळा असा अमिट ठसा उमटविला आहे. सहज-सुंदर अभिनायातून साकारलेल्या भूमिकांच्या रुपांमध्ये ते रसिकांच्या मनांत चिरंतन राहतील, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ अभिनेते सतीश शाह यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
सतीश शाह यांनी चित्रपट सृष्टी, रंगभूमी आणि दूरचित्रवाणी या तीनही माध्यमांत काम करताना रसिकांची दाद मिळवली. विनोदी, सहज-सुंदर, निखळ मनोरंजनात्मक भूमिका ते चरित्र अभिनेता अशी त्यांची वाटचाल राहीली. निखळ आणि भूमिकांना न्याय देणारा प्रामाणिक अभिनेता म्हणून त्यांची ओळख होती. मराठी चित्रपट सृष्टीच्या गौरवात भर घालणाऱ्या स्व. दादा कोंडके यांच्या चित्रपटात त्यांनी भूमिका वठवून मराठी रसिकांचीही दाद मिळवली. शाह यांच्या निधनामुळे कला क्षेत्राची हानी झाली आहे. या क्षेत्रातील पिढ्यांना जोडणारा एक मार्गदर्शक दुवा निखळला आहे. शाह यांच्या कुटुंबियांच्या आणि त्यांच्या चाहत्यांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत, या सर्वांना हा आघात सहन करण्याची ताकद मिळो, अशी प्रार्थना करून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ अभिनेते सतीश शाह यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.






