महाराष्ट्रमुंबई

‘राजहंस व्याख्यानमाले’त गप्पा आणि गाण्यांची मैफिल — मधुवंती पेठे यांच्या बहुआयामी जीवनप्रवासावर दिलखुलास संवाद, रसिकांना लाभली संगीताची अनोखी मेजवानी

मुंबई; ‘राजहंस प्रतिष्ठान’ तर्फे आयोजित ‘राजहंस व्याख्यानमाला’ या दिमाखदार प्रतिभार्पण सोहळ्याच्या दुसऱ्या दिवशी प्रख्यात गायिका, लेखिका आणि अभिनेत्री  मधुवंती पेठे यांच्या बहुआयामी जीवनप्रवासावर आधारित ‘मैफिल गप्पांची आणि गाण्याची’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

गोरेगाव (पूर्व) येथील नंदादीप विद्यालयाच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

 मधुवंती पेठे या मराठी संगीत आणि कला क्षेत्रात ५० वर्षांहून अधिक काळ कार्यरत असलेले एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्व आहेत. त्यांच्या या प्रदीर्घ कारकिर्दीचा प्रवास, कलाक्षेत्रातील आव्हाने आणि यश यावर मुलाखतकार मंदार खराडे यांनी गप्पांच्या माध्यमातून प्रकाश टाकला. ‘छंदबद्ध’, ‘प्रेम’, ‘मैत्री’ आणि ‘जीवन’ यांसारख्या विविध विषयांवरील रचना तसेच नव्या पिढीच्या कवितांवर त्यांनी मनमोकळा संवाद साधला.

“ठरवून काही केलं नाही, संधी मिळाल्या त्यांना आव्हान म्हणून स्वीकारलं,” असे सांगत पेठे यांनी आपला कलाप्रवास उलगडला.

बहुआयामी कारकीर्द आणि सन्मान

गायन आणि संगीत:
त्या प्रामुख्याने हिंदुस्थानी शास्त्रीय आणि अर्ध-शास्त्रीय संगीताच्या गायिका म्हणून ओळखल्या जातात. त्यांनी अनेक बंदिशींची रचना केली आहे.

नाट्य आणि पुरस्कार:
‘संगीत ओंकार’ (२००१) या नाटकासाठी त्यांना महाराष्ट्र राज्य संगीत नाटक स्पर्धेतील संगीत दिग्दर्शनासाठी प्रथम क्रमांकाचा पुरस्कार तसेच ‘छोटा गंधर्व उत्कृष्ट गीतकार पुरस्कार’ (अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद) यांसारखे सन्मान मिळाले आहेत. १९७८ ते २०२२ असा त्यांचा संगीत रंगभूमीवरील दीर्घ आणि यशस्वी प्रवास आहे.

लेखन व अध्यापन:
‘सूररंगी रंगले’ या सदराद्वारे त्यांनी संगीतातील क्लिष्ट संकल्पना सोप्या भाषेत रसिकांपर्यंत पोहोचवल्या. या लेखांचा संग्रह ‘परिसस्पर्श’ या पुस्तकरूपात प्रकाशित झाला आहे.

या कार्यक्रमात पेठे यांना तबल्याची साथ पं. राजेंद्र वैश्यपायन यांनी दिली.
मैफिलीच्या शेवटी पेठे यांनी आपल्या काही लोकप्रिय रचना सादर करून रसिकांना संगीताची अनोखी अनुभूती दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!