झाडं वाचवा, नाहीतर ‘यम सरकार’ तुमच्या दारी! – तपोवन रक्षणासाठी सयाजी शिंदे यांची हाक
दमदार अभिनेते आणि निसर्ग प्रेमी सयाजी शिंदे यांची थेट भेट

थेट-भेट
(महेश वैजयंती भगवान पावसकर)
आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर करणारे अभिनेते सयाजी शिंदे, गेल्या काही वर्षांपासून पर्यावरण चळवळीतील एक महत्त्वाचे आणि सक्रिय कार्यकर्ते बनले आहेत. नाशिक येथील आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी तपोवन साधुग्राम परिसरातील सुमारे १८०० झाडांच्या प्रस्तावित वृक्षतोडीविरोधात त्यांनी घेतलेली तीव्र भूमिका सध्या महाराष्ट्रात गाजते आहे. या गंभीर विषयावर त्यांनी ‘गोरेगाव मिरर’ साठी खास मुलाखत दिली, ज्यात त्यांनी सरकार आणि नोकरशाहीच्या कारभारावर सडेतोड टीका केली.
‘आई आणि झाड’ हेच खरे; बाकी सर्व मनाचे खेळ
सयाजी शिंदे यांच्या पर्यावरणवादी भूमिकेचा पाया त्यांच्या निसर्ग प्रेमात आहे. आपल्या भूमिकेबद्दल बोलताना ते म्हणतात, “माझी भूमिका अगदी साधी आहे. मी नेहमीच मानतो की, जगात आई आणि झाड या दोनच गोष्टी खऱ्या आहेत. सत्ता, मत्ता आणि महत्वाकांक्षा हे सर्व मनाचे खेळ आहेत. झाड नसेल तर ऑक्सिजन नाही, अन्न नाही, मग आपण जगणार कशावर?”
नाशिकमधील वृक्षतोडीची बातमी कळताच त्यांनी तपोवनाला भेट दिली. प्रत्यक्ष पाहणीनंतर त्यांच्या भावना अधिक तीव्र झाल्या. “मी तिथे गेलो, तेव्हा झाडांवरती ‘फुल्या’ (X marks) मारलेल्या पाहिल्या. जसा यम कोणाचा नंबर आला की घेऊन जातो, तसे शासनाने या झाडांना मृत्यूची चिन्हे लावली होती. म्हणून मला वाटलं, हे ‘यम गव्हर्मेंट’ आहे का?” असा संतप्त सवाल त्यांनी केला.
‘बिल्डर म्हणजे आजच्या काळातले राक्षस’
केवळ कुंभमेळ्यासाठी नाही, तर या वृक्षतोडीमागे मोठा व्यावसायिक अजेंडा असल्याचा संशय सयाजी दादांनी व्यक्त केला. “मला मिळालेल्या माहितीनुसार, १४ नोव्हेंबरला तिथे एक्झिबिशन सेंटर आणि काही बंगले बांधण्यासाठी २२० कोटी रुपयांचे टेंडर काढण्यात आले होते आणि ते अजूनही रद्द झालेले नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.
या भूखंडांवर डोळा ठेवणाऱ्यांवर टीका करताना ते म्हणाले, “बिल्डर म्हणजे आजच्या काळातले राक्षस आहेत. ज्या जमिनीवर अन्न-पाणी उगवते, पशु-पक्षी जगतात, त्या जमिनीवर बिल्डिंग बांधून तुम्ही परत काही उगवण्याचा चान्सच ठेवत नाहीत. ही राक्षस वृत्ती नाही तर काय आहे?”
ते पुढे सांगतात की सरकार केवळ नजरचुकीने हे करत नाहीये, तर ते ‘झोपेचं सोंग’ घेत आहे.
धर्माचे काम नव्हे, ‘माणूस धर्म’ महत्त्वाचा
कुंभमेळा हे धर्माचे कार्य आहे, म्हणून वृक्षतोडीला विरोध करणाऱ्यांवर धर्मद्रोही म्हणून टीका होण्याची शक्यता असतानाही, सयाजी शिंदे यांनी आपली भूमिका ठामपणे मांडली.
“धर्म-विर्म असं काही नसतं. जगात एकच धर्म असतो, तो म्हणजे माणूस धर्म,” असे ते ठामपणे सांगतात. “झाडं पृथ्वीवर प्रथम आली, नंतर माणसं आली आणि मग जाती-धर्म आले. जो मनुष्य मानव जातीचा, पशु पक्षी-प्राण्यांचा सद्सद्विवेक बुद्धीने चांगला विचार करतो, तोच खरा साधू.” झाडं तोडून धर्माच्या नावाखाली माणसांना दुःखी करणं हे कुठल्याही धर्मात बसत नाही, असे त्यांचे मत आहे.
सरकारची दिशाभूल: ३३ कोटी रोपे कागदोपत्री
मंत्री गिरीश महाजन यांनी १८०० झाडे तोडून दुसरीकडे १८,००० झाडे लावण्याची घोषणा केली होती, यावर बोलताना सयाजी दादांनी सरकारी वृक्षारोपण मोहिमेतील त्रुटी उघड केल्या.
“मुळात, १८,००० झाडं कोणी लावत नाही! यापूर्वी ३३ कोटी झाडं लावण्याचे जे हिशोब कागदोपत्री झाले, ते सगळे खोटे आहेत,” असे ते म्हणाले. शासनाची ब्युरोक्रसी देशी झाडांऐवजी गुलमोहरसारखी (विदेशी) रोपटी पटकन वाढतात म्हणून लावते आणि फक्त कागदपत्रे दाखवते. “हे राजकारणी आणि ब्युरोक्रसी स्वतःलाच फसवतायत,” असे त्यांचे म्हणणे आहे.
“झाडांच्या लागवडीसाठी हैदराबादहून रोपं आणणार, हा तर हास्यास्पद प्रकार आहे! महाराष्ट्राला काय रोग लागला आहे? ७० वर्षांचे फॉरेस्ट डिपार्टमेंट काय करतंय? लाखो रुपये पगार घेतात आणि नर्सरीची अवस्था भिकारी आहे,” अशा शब्दांत त्यांनी वन विभागाच्या उदासीनतेवर कोरडे ओढले.
आईसाठीचा लढा
या मोहिमेतील आपली आगामी भूमिका स्पष्ट करताना सयाजी शिंदे म्हणाले, “माझी भूमिका सारखीच आहे. जिथे जिथे झाडं तुटतात, तिथे ती वाचतील कशी, ट्रान्सप्लांट कशी होतील, यावर लक्ष द्यायचं.”
“झाड हे आपले आईबाप आहेत आणि आईबापावर कोणी हल्ला करायला आला, तर आपण गप्प बसणार नाही. माझी आई नंतर माझे झाड हीच माझी आई आहे. मला यात नाव किंवा पैसा मिळवायचा नाहीये, पण झाडांसाठी मी एका पायावर धावणार.”
त्यांचा हा सच्चा निर्धार नाशिकच्या पर्यावरण चळवळीला नवी ताकद देणारा ठरणार यात शंका नाही.

Mahesh Pawaskar
Editor-9967949356






