‘बॉम्बे’चे ‘मुंबई’ करण्याचे श्रेय केवळ शिवसेनेचेच!

मुंबई: निवडणुका आल्या की भावनात्मक मुद्दे पुढे करुन जनतेला भरकटविण्याचा धंदा सुरु होतो आणि मूळ प्रश्न, समस्या बाजूलाच राहतात. त्यातही काही केंद्रातले मंत्री मुंबईत आले की काहीही बरळतात आणि त्या मुद्द्यावर चर्वितचर्वण सुरु होते. केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह मुंबईत आले आणि इंडियन इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी च्या नावात मुंबई नाही, बॉम्बे आहे हे पाहून मला आनंद झाला, असे बोलून गेले. मध्यंतरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एक दिग्गज नेते भय्याजी जोशी हे घाटकोपर येथे येऊन घाटकोपर ची भाषा गुजराती असल्याचे तारे तोडून गेले. या लोकांना भावनात्मक मुद्यांच्या मधमाशांच्या पोळ्याला धक्का लावण्याची गरज काय ? पण असे बोलले नाही तर मग राजकीय पोळी कशी भाजणार ? जितेंद्र सिंह यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्यावर तत्काळ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तलवार उपसली. त्यांनी जबरदस्त प्रहार केला. मुंबई ही गुजरातला जोडण्याचे हे षडयंत्र असल्याचा घणाघाती आरोप राज ठाकरे यांनी केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांच्या वक्तव्याचा निषेध केला नाहीच पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून इंडियन इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी च्या नावात बॉम्बे चे मुंबई करण्याबाबत विनंती करु, असे सांगितले. कां ? २०१४ पासून (मधली अडीच वर्षे वगळता) आजतागायत आपण सत्तेवर आहात नां ? मग अकरा वर्षांनंतर केंद्राला पत्र पाठवण्याचा विचार मनात आला? खरे म्हणजे जितेंद्र सिंह यांचे आभारच मानायला हवेत. निदान त्यांच्या वक्तव्यामुळे तरी देवाभाऊंच्या मनात केंद्राला पत्र लिहिण्याची सुबुद्धी सुचली. हे करतांना देवाभाऊंनी बॉम्बे चे मुंबई करण्याचे श्रेय राम नाईक यांचे असल्याचे सांगत आडवळणाने भारतीय जनता पक्षाचे श्रेय असल्याचे दाखवून दिले. मुळात छगन चंद्रकांत भुजबळ यांनी ते शिवसेनेचे नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर मुंबई चे महापौर असतांना हिंदुस्थान च्या महाद्वारावर म्हणजेच गेटवे ऑफ इंडिया येथे मुंबई हा भलामोठा फलक लावून ही मुंबई आहे, बॉम्बे नाही, हे ठणकावून सांगितले.

शिवसेना भारतीय जनता पक्ष यांच्या युतीचे शिवशाहीचे सरकार १४ मार्च १९९५ रोजी महाराष्ट्रा येताच मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत बॉम्बे चे मुंबई, औरंगाबाद चे संभाजीनगर आणि उस्मानाबाद चे धाराशिव करण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. शिवसेनेचे खासदार विनायक राऊत, अरविंद सावंत यांनी संसदेत कितीतरी वेळा हे मुद्दे उपस्थित केले आहेत. वांद्रे, बांदरा, बॅण्डरा चे ‘वांद्रे’ करण्यासाठी संसदेत घसा कोरडा केला. मुंबई सेंट्रल चे जगन्नाथ ऊर्फ नाना शंकरशेट हे नांव देण्याची मागणी शिवसेनेने लावून धरली. प्रभादेवी या मंदिराचा शंभर वर्षांचा इतिहास असलेल्या मंदिरावरुन शिवसेना नेते दिवाकर रावते यांच्या आग्रहामुळे एल्फिन्स्टन रोडचे प्रभादेवी होऊ शकले. परंतु जेवढे सोयीचे तेवढेच करायचे, मग निवडणुकीच्या तोंडावर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची घोषणा करायची, जेणे करुन मतांची गणिते सोडवता येतील. बिहार मध्ये प्रत्येक महिलेच्या खात्यात दहा दहा हजार रुपये परस्पर भरुन महिलांची मते खरेदी करण्याचा गोरखधंदा करण्यात आला.
मुख्यमंत्री डॉ. मनोहर जोशी यांनी १ मे १९९५ पासून मराठी मध्येच महाराष्ट्र शासनाचा व्यवहार होईल, मराठी भाषेतच प्रशासनाला व्यवहार करावा लागेल, हे ठणकावून सांगणारा शिवसेनेचाच नेता होता, हे सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ आणि स्पष्ट आहे. त्यामुळे कुणी कितीही राम राम केले तरी बॉम्बे चे मुंबई करण्याचे श्रेय हे केवळ आणि केवळ हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील आणि तदनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील ज्वालाग्राही मशाल हाती घेणाऱ्या शिवसेनेचेच आहे, हे सांगण्यासाठी कुण्या ज्योतिषाची गरज नाही.
२०१४ साली महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचे अल्पमतातील सरकार शरद पवार यांच्या अदृष्य हातांच्या पाठिंब्यावर टिकले होते परंतु २२ वर्षात जेवढी बदनामी सहन करावी लागली नाही तेवढी केवळ २२ दिवसांत सहन करावी लागली असे सांगून देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठिंब्यासाठी धर्मेंद्र प्रधान आणि चंद्रकांत पाटील यांना मातोश्रीवर पाठवून त्यांचा पाठिंबा मागितला. उद्या आम्ही सत्तेत आलो तर आमच्या लोकांना अनुभव हवा आणि दुसरे म्हणजे आम्ही रस्त्यावरचेच संघर्ष करणारे लोक आहोत, आमची नाळ जनतेशी जोडलेली आहे, असे सांगून उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा दिला. १२ नोव्हेंबर २०१४ ते ५ डिसेंबर २०१४ पर्यंत विरोधीपक्षनेते असलेल्या एकनाथ संभाजी शिंदे यांनी ५ डिसेंबर २०१४ रोजी सायंकाळी मंत्रिपदाची शपथ घेतली. उद्धव ठाकरे यांच्या पाठिंब्यावर देवेंद्र फडणवीस यांचे सरकार २०१९ पर्यंत टिकले तसेच भारतीय जनता पक्ष सरकारला उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या पाठिंब्यामुळेच.

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे मंत्री म्हणूनच एकनाथ शिंदे हे सरकारात होते. या घटना देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या विस्मृतीत गेलेल्या दिसतात. कारण उद्धव ठाकरे यांच्या पाठिंब्यामुळेच भारतीय जनता पक्षाचे नेते मंत्री होऊ शकले, याची जाणीव त्यांना नाही. मग बॉम्बे चे मुंबई हे शिवसेनेमुळेच झाल्याचे त्यांना कसे लक्षात राहील ? राजकारणात काही गोष्टी पद्धतशीरपणे विस्मृतीत घालवायच्या असतात हेच जणू भारतीय जनता पक्षाचे नेते आपल्या कृतीतून दाखवून देत असावेत. “महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले | मराठ्याविना राष्ट्रगाडा न चाले || खरा वीर वैरी पराधीनतेचा | महाराष्ट्र आधार या भारताचा ||” हा संयुक्त महाराष्ट्र चळवळीतले अग्रणी पांडुरंग महादेव उर्फ सेनापती बापट यांनी सांगितलेला मंत्र महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या राज्यकर्त्यांनी पक्का ध्यानात ठेवायला हवा. त्याचप्रमाणे शिवचरित्राचे गाढे अभ्यासक शिवभक्त राजू देसाई यांनी सांगितल्याप्रमाणे राज्यगीतातील “दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा” यात बदल करुन “दिल्लीच्या तख्तावर बैसतो महाराष्ट्र माझा”, हे करण्याची वेळ आली आहे. अर्थात ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे या गोष्टी दृष्टीपथात आल्याशिवाय राहणार नाहीत.
🚩जय महाराष्ट्र !🚩. -योगेश वसंत त्रिवेदी, ९८९२९३५३२१. (लेखक ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आहेत)





