मालवण निवडणुकीतील राजकीय वाद संपुष्टात! ‘रवींद्र चव्हाण माझ्या मोठ्या भावासारखे’ – आमदार निलेश राणे यांची स्पष्टोक्ती..

मुंबई : मालवण नगरपरिषदेच्या निवडणुकीदरम्यान शिवसेना (शिंदे गट) आमदार निलेश राणे आणि भारतीय जनता पक्षाचे (भाजप) प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यात निर्माण झालेला राजकीय वाद अखेर संपुष्टात आला आहे. नागपूर येथील हिवाळी अधिवेशनादरम्यान या दोन्ही नेत्यांची भेट झाली असून, यावेळी आमदार निलेश राणे यांनी चव्हाण यांच्याविषयी आदर व्यक्त करत, “रवींद्र चव्हाण माझ्या मोठ्या भावासारखे आहेत,” अशी भावनिक प्रतिक्रिया प्रसार माध्यमांना दिली आहे.
निवडणुकीतील तणावावर पडला पडदा
मालवणमधील नगरपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने निलेश राणे आणि रवींद्र चव्हाण यांच्यात जोरदार शाब्दिक संघर्ष झाला होता. या वादामुळे निवडणूक काळात वातावरण चांगलेच तापले होते. इतकेच नाही तर, निलेश राणे यांनी याच वादामुळे त्यांचे बंधू नितेश राणे यांच्यावरही टीका केली होती. या दोन्ही प्रमुख नेत्यांमधील तणावामुळे ‘महायुती’मध्येही काही प्रमाणात तणाव निर्माण झाला असल्याची चर्चा होती.
मात्र, निवडणूक प्रक्रिया संपताच या सर्व वादावर पडदा टाकण्यात आला आहे.
अधिवेशनात झाली गळाभेट
सोमवारी दुपारी नागपूरमधील हिवाळी अधिवेशनावेळी विधिमंडळ परिसरात निलेश राणे आणि रवींद्र चव्हाण हे समोरा-समोर आले. निवडणुकीत भाजपवर जोरदार टीका करणारे निलेश राणे आणि चव्हाण यांनी यावेळी हसतखेळत भेट घेतली, तसेच दोघांमध्ये गळाभेटही झाली. या भेटीनंतर जुने राजकीय वैर विसरल्याचे स्पष्ट संकेत मिळाले.
या भेटीनंतर आमदार निलेश राणे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना त्वरित स्पष्टीकरण दिले. “आता माझे आणि रवींद्र चव्हाण यांचे काहीही वितुष्ट नाही,” असे त्यांनी सांगितले. “जे काही होते ते केवळ निवडणुकीपुरते होते,” अशी स्पष्ट प्रतिक्रिया त्यांनी दिली.
यावेळी रवींद्र चव्हाण यांच्याबद्दल बोलताना त्यांनी त्यांना मोठे बंधू मानले. त्यामुळे महायुतीतील नेत्यांमध्ये पुन्हा समन्वय निर्माण झाल्याचे चित्र यानिमित्ताने समोर आले आहे.




