महाराष्ट्र
जमिनीची मोजणी आता फक्त 200 रुपयांत; 90 दिवसांत पूर्ण होणार प्रक्रिया

सोलापूर : राज्य सरकारने जमिनीच्या मोजणीसंदर्भात मोठा निर्णय घेतला असून वडिलोपार्जित कुटुंबातील पोट हिश्यातील जमिनीची मोजणी आता केवळ 200 रुपयांत होणार आहे. ही मोजणी 90 दिवसांच्या आत पूर्ण करण्यात येणार आहे. सोलापूरसह राज्यभरात या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. मोजणीसाठी अर्ज करताना कुटुंबातील सर्व सदस्यांची सहमतीपत्रे अनिवार्य राहतील.
राज्यात जमिनीच्या वादातून दरवर्षी मोठ्या प्रमाणावर गुन्हे घडत आहेत. सोलापूर ग्रामीण भागातच वर्षाला साधारण 600 पेक्षा जास्त वादांची नोंद पोलिसांत होते. हे वाद कायमचे मिटवण्यासाठी शासनाने मोजणी प्रक्रिया सुलभ केली आहे. पूर्वी मोजणीसाठी नियमित आणि दुतगती असे दोन प्रकार होते, ज्यामध्ये नियमित मोजणीसाठी 10 दिवसांची तर दुतगतीसाठी 30 दिवसांची मुदत होती.
अर्जासोबत जोडायची कागदपत्रे
मोजणीसाठी अर्ज करताना खालील कागदपत्रे जोडावी लागतील :
•सातबारा उतारा
•उताऱ्यावरील सर्व कुटुंबीयांची संमतीपत्रे
•तहसील कार्यालयाचे एकत्र कुटुंब प्रमाणपत्र
अर्ज दाखल झाल्यानंतर संबंधित कुटुंबीयांना मोजणीवर आक्षेप घेण्याचा अधिकार राहणार नाही आणि प्रक्रिया नियमित पद्धतीने पूर्ण केली जाईल.
सध्याच्या मोजणीचे शुल्क
ग्रामीण भागात नियमित जमिनीच्या मोजणीसाठी प्रति हेक्टर 2000 रुपये आणि शहरी भागात सुमारे 1000 रुपये अधिक आकारले जातात. दुतगती मोजणीसाठी दुप्पट शुल्क आकारले जाते. मात्र नव्या निर्णयानुसार पॉटर नंबरवरील वडिलोपार्जित जमिनीची मोजणी आता फक्त 200 रुपये शुल्कात करण्यात येणार आहे.
शासनाचा उद्देश
जमिनीवरील मालकी हक्क आणि सीमा स्पष्ट व्हाव्यात, जमिनीवरील वाद टाळावेत आणि शेतकऱ्यांवरील आर्थिक भार कमी करण्यात यावा, हा या योजनेचा प्रमुख उद्देश आहे.
अधिकाऱ्यांचे म्हणणे
“जमिनीची मोजणी आतापर्यंत नियमित व दुतगती अशा दोन प्रकारे व्हायची. यासाठी शुल्क 2 ते 11 हजार रुपये असे निश्चित होते. आता नवीन निर्णयानुसार एका कुटुंबातील जमिनीची मोजणी 200 रुपयांत होणार आहे.”





