“भाजप नेत्यांनीच फडणवीसांची तुलना औरंगजेबाशी केली” – हर्षवर्धन सपकाळ

मुंबई प्रतिनिधी : “देवेंद्र फडणवीस यांच्या कारभाराची तुलना औरंगजेबाशी केली म्हणून भाजप नेत्यांना त्रास होतो, पण त्यांच्याच पक्षातील काही नेते फडणवीसांची तुलना क्रूरकर्मा औरंगजेबाशी करत आहेत,” असा घणाघात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. गांधी भवन येथे पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली.
“फडणवीसांच्या कारभारावर टीका केली तर मराठी अस्मितेला ठेच का?”
“राज्यात संतोष देशमुख यांची हत्या, स्वारगेट बलात्कार, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, महिलांवरील अत्याचार वाढले आहेत. या घटनांवरून फडणवीस सरकारच्या कार्यशैलीची तुलना औरंगजेबाच्या जुलमी राजवटीशी करण्यात आली. मात्र, त्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या व्यक्तीशी संबंध नाही,” असे सपकाळ यांनी स्पष्ट केले.
त्यांनी पुढे विचारले, “फडणवीस यांच्या कारभारावर टीका केली तर मराठी अस्मितेला ठेच कशी पोहोचते? पण छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचा अपमान झाल्यावर भाजपच्या नेत्यांना मराठी अस्मिता आठवत नाही का?” असा सवालही त्यांनी केला.
“औरंगजेब क्रूर होता, पण ब्रिटीशही तसेच होते”
“औरंगजेब क्रूर होता, हे नाकारता येणार नाही. पण इतिहास सांगतो की, छत्रपतींनी त्याला मराठा साम्राज्याच्या मातीत गाडले. तसेच ब्रिटीशही अत्याचारी होते. मग, त्यांच्या मदतीने उभ्या राहिलेल्या संस्था, स्मारके आणि पुतळे उखडण्याचे धाडस भाजप, बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषद करणार का?” असा थेट सवाल त्यांनी केला.
“बावनकुळे आणि भाजप नेत्यांचा दुटप्पीपणा”
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना सपकाळ म्हणाले, “बावनकुळे यांना फडणवीस यांच्या टीकेने मराठी अस्मिता दुखावल्याचे वाटते, पण शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यांवर ते गप्प का?”
याशिवाय, “भाजपच्या संतोष देशमुख यांची हत्या झाली, तरी त्यांच्या कुटुंबाला सांत्वन करायला बावनकुळे गेले नाहीत. उलट, मांडवली करण्याचा प्रयत्न केला. मात्र, आम्ही काँग्रेसच्या वतीने त्यांच्या कुटुंबाची भेट घेतली आणि सद्भावना यात्रा काढली,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
“भाजपचा खरा चेहरा समोर आला”
सपकाळ यांनी भाजप नेत्यांवर वैयक्तिक हल्ले झाल्याचा आरोप केला. “मी सामान्य कुटुंबातून आलो आहे, पण बावनकुळे आणि नारायण राणे यांनी माझ्यावर पातळी सोडून टीका केली. यातून भाजपचा खरा चेहरा समोर आला आहे,” असे ते म्हणाले.
सपकाळ यांच्या या टीकेला भाजपकडून काय उत्तर दिले जाते, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.