….तर त्या ‘लहानग्या मुलीला आपण न्याय देऊ शकणार नाही’ – आमदार सना मलिक-शेख यांनी सभागृहात व्यक्त केली खंत!

नागपूर: नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील अल्पवयीन मुलीवरील बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा होण्यासाठी या हिवाळी अधिवेशनात राज्य सरकारने कठोर पाऊले उचलली नाहीत, तर त्या लहानग्या मुलीला आपण न्याय देऊ शकणार नाही, अशा तीव्र शब्दांत अणुशक्तीनगरच्या आमदार सना मलिक-शेख यांनी आज विधानसभेत खंत व्यक्त केली.
मालेगाव येथील हृदयद्रावक प्रकरणावर लक्षवेधी चर्चेदरम्यान आमदार सना मलिक-शेख यांनी सहभाग घेत सभागृहाचे लक्ष वेधले.
‘फाशीची शिक्षा व्हावी’ – जलदगती न्यायालयात खटला चालवण्याची मागणी
आमदार सना मलिक-शेख यांनी १९८० मधील पंजाबमधील बच्चन सिंग प्रकरणाचा संदर्भ दिला. आरोपीने केलेला गुन्हा किती गंभीर आहे हे लक्षात घेता, महाराष्ट्र सरकारने हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवावे आणि संबंधित आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा मिळावी, अशी मागणी त्यांनी आग्रहाने केली.
मुख्यमंत्र्यांकडून कारवाईची माहिती
आमदार सना मलिक-शेख यांनी मांडलेल्या गंभीर मागणीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात लेखी निवेदनाद्वारे उत्तर सादर केले. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या लेखी निवेदनानुसार:
* आरोपीवर कारवाई: आरोपीवर १७-११-२०२५ रोजी गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.
* विशेष सरकारी वकील: या महत्त्वाच्या प्रकरणात विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
* जलदगती न्यायालय: हा खटला जलदगती न्यायालयात (Fast Track Court) वर्ग करण्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाचे महाप्रबंधक यांना विधी व न्याय विभागामार्फत विनंती करण्यात आली आहे.
* दोषारोपपत्र दाखल: या प्रकरणात ८ डिसेंबर २०२५ रोजी न्यायालयात दोषारोपपत्र (Charge Sheet) दाखल करण्यात आले आहे.
याव्यतिरिक्त, राज्यातील बालकांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी राज्य सरकारने एकूण सहा प्रकारच्या उपाययोजना केल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी लेखी उत्तरात दिली.





